‘नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहता कामा नये’

अमरावती | महावेधच्या पर्जन्यमापकात पावसाची नोंद न झाल्याने चांदूर बाजार तालुक्‍यातील संत्रा पीकविमाधारक शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहिले होते. या प्रकरणी आता जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला पत्र लिहीत शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळावी. तसेच भरपाईपासून शेतकरी वंचित राहता कामा नयेत, असे बजावले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरजगाव कसबा येथील १३५० शेतकऱ्यांनी आंबिया बहारातील संत्र्याचा विमा उतरविला होता. त्यापोटी विमा हप्ता म्हणून ६३ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला. ३० डिसेंबर व ३१ डिसेंबर २०१९ ला शिरजगाव कसबा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. परिसरातील मेघा नदीला पूरही आला. या पावसाची महसूल दप्तरी नोंद आहे. त्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टी झाली म्हणून या भागात पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेशही दिले.

वाचा :   शालेय पोषण आहारात "महानंद"च्या दुधाचा समावेश

महावेधच्या पर्जन्यमापक यंत्रात मात्र या दोन दिवसांच्या पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली. विमा भरपाई मिळू नये याकरिता पर्जन्यमापक यंत्रणाच विमा कंपनीकडून बंद करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांना भरपाईपोटी १९ हजार २५० रुपयांप्रमाणे २ कोटी ९५ लाख रुपये कंपनीकडून मिळणे अपेक्षित होते.

शेतकऱ्यांना भरपाईची अपेक्षा
याप्रश्‍नी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील प्रशासनाला पत्र लिहीत कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. संत्रा पीक विमा मिळण्यापासून परिसरातील शेतकरी वंचित राहता कामा नयेत, असे या पत्रात त्यांनी नमूद केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मंत्री कडू यांच्या या भूमिकेमुळे लवकरच याप्रकरणी तोडगा निघून भरपाई मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

वाचा :   पूरग्रस्ताच्या मदतीसाठी जिल्हातील नेते सरसावले
Read Previous

रोहयोतील गैरप्रकारप्रकरणी सीईओंकडे तक्रार

Read Next

मसुरे लघु पाटबंधारे प्रकल्पास २२ कोटी ११ लाखांची प्रशासकीय मान्यता