उत्पादनवाढीसाठी पिकांचा फेरपालट आवश्‍यक : डॉ. देवसकर


ई ग्राम,परभणी (प्रतिनिधी)
: ‘‘माती परीक्षणानुसार पिकांना खतांच्या शिफारशीत मात्रा देणे आवश्यक आहे. जमिनीतील वेगवेगळ्या थरांमध्ये अन्नद्रव्ये उपलब्ध असतात. त्यामुळे दरवर्षी पिकांचा फेरपालट करणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होते,’’ असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसकर यांनी केले. इफ्फको आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालयातर्फे परभणी येथे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आयोजित आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाच्या उद्‌घाटन करण्यात आले.

‘आरजीबी इप्फको’च्या अध्यक्षा कल्पना अग्रवाल, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, कृषी अधिकारी (गुणनियंत्रक) दीपक सामाले, ‘इफ्फको’चे मुख्य प्रक्षेत्र विस्तार व्यवस्थापक प्रताप कोटेचा, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके आदी उपस्थित होते.डॉ. देवसरकर म्हणाले, ‘‘मराठवाड्यातील जमिनीमध्ये जस्त, लोह, तांबे या मूल्यद्रव्यांची कमतरता आहे. विविध पिकांचे नवीन वाण अधिक उत्पादन देणारी आहेत. त्यामुळे खतांच्या मात्रा देण्याच्या शिफारशीत बदल करण्याची गरज आहे. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी हिरवळीच्या खतांच्या वापरावर भर द्यावा लागेल. कृषी विद्यापीठातर्फे विकसित पिकांचे वाण, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा.’’

सामाले म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी दर्जेदार खते, अन्य निविष्ठांची खरेदी करणे आवश्यक आहे.’’ तर डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनासोबतच विक्रीचे कौशल्य आत्मसात करावे.’’ तांत्रिक सत्रामध्ये डॉ. आळसे यांनी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापनावर सादरीकरण केले. कोटेचा यांनी कर्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

image curtesy : Earth Observing System.

Read Previous

ज्वारीचे २५० एकरातील पीक फस्त, शेतकऱ्यांवर संकट

Read Next

तापमानात चढ-उताराची शक्यता