चिकूचे विविध प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ


ई-ग्राम : चिकू फळांवर प्रक्रिया करून त्यांपासून टिकाऊ खाद्यपदार्थ तयार करून चांगला आर्थिक लाभ मिळवता येतो. पपई फळांपासून टॉफी, जॅम, जेली, ज्यूस, गर (पल्प), स्क्वॅश, पावडर इ. प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ तयार करता येतात.

चिकू फळाचे जास्तीत जास्त क्षेत्र काळी पत्ती, क्रिकेट बॉल व डोला दिवानी या जातींच्या लागवडीखाली आहे. आरोग्यदृष्ट्या चिकू फळामध्ये तंतुमय पदार्थ (फायबर), जीवनसत्त्वे (ब आणि क) व खनिजद्रव्ये (पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि झिंक) या अन्नद्रव्यांचे प्रमाण मुबलक आहे. चिकू हे एक कमी दिवस टिकून राहणारे फळपीक आहे, त्यामुळे त्याची लवकर विक्री न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते.

चिकू फळापासून तयार करता येणारे प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ –
चिकू पावडर (भुकटी) 
चिकू पावडरचा वापर फळांचा हंगाम नसताना चिकू फळांपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी होतो. प्रथम पिकलेल्या चिकू फळापासून गर (पल्प) तयार करावा. हा गर घट्ट होईपर्यंत मंद आचेवर किंवा निर्वात पोकळीच्या सान्निध्यात घट्ट करावा. घट्ट झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या ट्रेमध्ये पसरून सूर्यप्रकाशात किंवा (कॅबिनेट ड्रायरमध्ये ५०-५५ अंश सेल्सिअस तापमानाला २४-२८ तास) वाळवणी यंत्राच्या साह्याने वाळवावा. वाळलेला गर दळणी यंत्राच्या साह्याने दळून, गराची भुकटी करावी किंवा चिकू फळास बारीक कप देऊन त्यांच्या फोडी तयार कराव्यात. फळांच्या फोडी स्टेनलेस स्टीलच्या ट्रेमध्ये पसरून सूर्यप्रकाशात किंवा (कॅबिनेट ड्रायर: ६५-७० अंश सेल्सिअस तापमानाला १२-१४ तास) वाळवणी यंत्राच्या साहाय्याने वाळवाव्यात. कडक वाळलेल्या फोडी दळणी यंत्राच्या साह्याने दळून, भुकटी करावी. तयार झालेली भुकटी प्लॅस्टिकच्या पिशवीत हवाबंद करावी.

वाचा :   का म्हणतात शेळीला गरीबाची गाय ?

गर (पल्प)
चिकू फळांच्या हंगामात त्यापासून गर (पल्प) तयार करून तो हवाबंद कॅन/बाटल्यांमध्ये दीर्घकाळ साठवून ठेवता येतो व फळांचा हंगाम नसताना त्याचा वापर विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी होऊ शकतो. गर (पल्प) तयार करताना पूर्ण पिकलेली निरोगी फळे निवडावीत व ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. फळे स्क्रू-टाईप ज्युसरमध्ये टाकून गर तयार करावा. गराचा शर्करांश (साखरेचे प्रमाण) २०-२२ अंश ब्रिक्स करून आम्लता ०.५ टक्के ठेवावी. त्यानंतर तयार झालेला गर निर्जंतुक केलेल्या कॅन/काचेच्या बाटल्यांमध्ये भरावा. बाटल्या ८०-८५ अंश सल्सिअस तापमानाला १०-१५ मिनिटे गरम पाण्यात ठेवाव्यात, सदर प्रक्रियेमुळे गर (पल्प) दीर्घकाळ चांगला टिकविला जातो.

वाचा :   जेजुरीच्या महाविद्यालयात अन्नप्रक्रिया उद्योग मार्गदर्शन

रस (ज्यूस)
पिकलेली चिकू फळे स्वच्छ धुवून त्यावरील साल काढून टाकावी. फळांचे बारीक काप करून ते मिक्सरमधून फिरवून त्यापासून गर (पल्प) तयार करावा. दाबयंत्राच्या मदतीने गरापासून रस वेगळा करावा. रस मलमलच्या कापडातून (चाळणीतून) गाळून घ्यावा. तयार रस दीर्घकाळ टिकविण्यासाठी ८०-८५ अंश सेल्सिअस तापमानाला १०-१५ मिनिटे उकळावा किंवा रसामध्ये ०.३ ग्रॅम सोडियम बेन्झोएट प्रति किलो हे परिरक्षक मिसळून रस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरावा.

जॅम
पिकलेली चिकू फळे घेऊन त्यापासून गर (पल्प) तयार करावा. जॅम तयार करण्यासाठी १ किलो गर (पल्प) स्टीलच्या पातेल्यात घेऊन त्यात ७५० ग्रॅम साखर मिसळून गॅसच्या मंद आचेवर शिजवून त्यामध्ये साखर पूर्णतः विरघळून घ्यावी. त्यानंतर मिश्रणात १.५ ते २ टक्के सायट्रिक आम्ल मिसळावे (आम्ल टाकल्यामुळे जॅममध्ये साखर पूर्णतः विरघळते व त्याचे पांढरे स्फटिक तयार होत नाहीत). शेवटी जॅम तयार झाला आहे का नाही हे ओळखण्यासाठी त्याचा शर्करांश (साखरेचे प्रमाण-ब्रिक्स) ६८.५ टक्के आला आहे का हे पहावे (शर्करांश मोजण्यासाठी हॅन्ड रिफ्रक्ट्रोमीटरचा वापर करावा) किंवा त्याचा १ थेंब ग्लासमधील पाण्यात मिसळून तो जर न विरघळता जसाच्या तसा राहिला तर जॅम तयार झाला आहे असे समजावे. तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरावा.

वाचा :   का म्हणतात शेळीला गरीबाची गाय ?

चिकू टॉफी
पिकलेली फळे घेऊन त्यापासून गर (पल्प) तयार करावा. टॉफी तयार करण्यासाठी चिकू गर (पल्प) १ किलो, साखर ६५० ग्रॅम, लिक्विड ग्लुकोज ८० ग्रॅम, दूध पावडर ६० ग्रॅम, सायट्रिक आम्ल २ ग्रॅम आणि वनस्पती तूप १०० ग्रॅम इ. प्रमाण वापरावे.
गर जाड बुडाच्या कढईत टाकून त्यात वितळलेले वनस्पती तूप मिसळून गर गॅसच्या मंद आचेवर चांगला शिजवून आटवावा. मोजलेली साखर, दूध पावडर, सायट्रीक आम्ल हे घटक टाकून मिसळून मिश्रण एकजीव करावे. मंद आचेवर मिश्रण सतत ढवळून शेवटी त्यात लिक्विड ग्लुकोज मिसळून मिश्रणाचा शर्करांश (साखरेचे प्रमाण) ७०-७२० ब्रिक्सच्या (शर्करांश मोजण्यासाठी हॅन्ड रिफ्रक्ट्रोमीटरचा वापर करावा) दरम्यान आल्यावर गॅस बंद करून मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये पसरून ठेवावे. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे ०.७ ते १ सें. मी. जाडीचे काप करावेत व तयार टॉफी पॉलिथीन, बटर पेपर किंवा टॉफी रॅपरमध्ये पॅक करावी.

Read Previous

खरिप हंगामात सोयाबीन बियाण्याच्या टंचाईची शक्यता

Read Next

अडीच लाख टन कडधान्य देशाच्या विविध बंदरांमध्ये पडून