अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे १० ते १५ टक्के नुकसान

Smiley face < 1 min

नवी दिल्ली – गेल्या काही आठवड्यांपासून मध्य भारतात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे खरीप तेलबिया, मुख्यत: सोयाबीन आणि भुईमूगाच्या विक्रमी उत्पादनाची शक्यता ओसरली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यांमधील शेतकऱ्यांनी यंदा तेलबियांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ केली. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे ७ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. अधिकृत माहितीनुसार, गुजरात आणि इतर राज्यांमध्ये अद्याप पिकांच्या नुकसानाचे मूल्यांकन करणे बाकी आहे.

egram

संपूर्ण देशभरात ऑगस्टमधील पाऊस २६ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. तर, शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब म्हणजेच ऑगस्ट महिन्यातील पाऊसही सर्वसाधारणपेक्षा अधिक असणार आहे. ऑगस्ट महिन्यात गुजरातमध्ये १९८ टक्के जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. तर, मध्य प्रदेशात ४५ आणि महाराष्ट्रात ३९ टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला आहे.

पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने या आठवड्यात सोयाबीनचे दर ३ हजार ८०० प्रतिक्विंटलवरुन ४ हजार प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सोपाच्या अंदाजानुसार यंदा अतिवृष्टीमुळे १० ते १२ टक्के पिकाचे नुकसान होणार आहे.

सोपाचे कार्यकारी संचालक डी. एन. पाठक म्हणाले की, देशात सद्यस्थितीमध्ये सुमारे १० लाख टन साठा शिल्लक आहे. तर, भारतातील सोयाबीनला मिळणाऱ्या अधिकच्या किमतीमुळे निर्यातही होताना दिसत नाही. यामुळे, पिकांचे नुकसान झाले तरी सोयाबीन बियाणांच्या उपलब्धतेत फरक पडणार नाही.

दरम्यान, मध्य प्रदेशात यंदा ५८.५३ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज सोपाने वर्तवला आहे. गेल्या वर्षी हा आकडा ४०.१७ लाख टन इतका होता. तर, देशभरात यंदा १२२.४७ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. मागील वर्षी हा आकडा ९३.०६ लाख टन इतका होता.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App