खानदेशात पोल्ट्रीतील पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही; जळगावात बर्ड फ्लूची भीती

Smiley face < 1 min

जळगाव – खानदेशात पोल्ट्री फार्ममध्ये पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही वेगात सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत सव्वा लाख मांसल पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत दोन लाख मांसल पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

नवापूर (जि. नंदुरबार) येथे बर्ड फ्लू आढळल्याने यंत्रणेत खळबळ उडाली आहे. यंत्रणेपर्यंत आजाराची माहिती पोचत नव्हती, हे देखील समोर आले आहे. या निष्काळजीपणामुळे खानदेशात पशुधनावरही हा आजार येण्याची भीती आहे. कारण आजार आल्यानंतर पाच ते सात दिवसांत यंत्रणा संसर्ग झालेल्या मांसल पक्ष्यांना नष्ट करीत आहे. एवढ्या कालावधीत बर्ड फ्लू अनेक भागात पसरला असण्याची भीती व्यक्त होत आहे. यातच पशुधनात हा आजार येईल, याची कुठलीही दक्षता जळगाव, धुळ्यात पशुसंवर्धन विभागाने घेतलेली नाही.

वाचा:  आरोग्य कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर तुफान राडा

जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत जामनेर, जळगाव, पाचोरा भागात बैल, म्हशीमध्ये अज्ञात आजार आल्याची माहिती आहे. जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथे काही शेतकऱ्यांचे बैल व दुधाळ म्हशी अचानक आजाराने ग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना पशुवैद्यक रविवारी (ता. ७) दवाखान्यात आढळले नाहीत.

खासगी सेवेच्या माध्यमातून पशुधनावर उपचार करून घ्यावे लागले. यातच शासकीय पशुवैद्यकीय यंत्रणा गावात लसीकरण, मोफत समुपदेशन, मार्गदर्शन यासाठी पोचलेली नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यामुळे पशुवैद्यकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, जळगाव जिल्ह्यात पशुधनातही बर्ड फ्लू आला की काय, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. यामुळे पशुवैद्यकीय यंत्रणेने संबंधित गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणे, पशुधनाची तपासणी करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वाचा:  कोकणात पावसाचा जोर वाढला; अनेक भागात धुवॉधार

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अनेक पोल्ट्री फार्म मांसल पक्षी नष्ट करून रिकामे करण्यात आले आहेत. पण काही पोल्ट्री फार्ममध्ये अद्यापही मांसल पक्षी आहेत. त्यांना संसर्ग झालेला नसल्याचा दावा पोल्ट्रीधारक करीत आहेत. यामुळे कारवाई करावी की, नाही या संभ्रमात यंत्रणा पडली आहे. ठोस उपाययोजना जळगाव जिल्ह्यात दिसत नसल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

वाचा:  नियम न पाळता बाजारात मोठी गर्दी; कोरोना बसलाय टपून

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App