अॅग्रो बुलेटीन १ ऑगस्ट २०२०

Smiley face 2 min

१)पीकविमा नोंदणीत देशात महाराष्ट्राची आघाडी
पंतप्रधान पीकविमा योजनेत कृषी विभागाने ८६ लाखाहून जास्त शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करीत देशात विक्रम केला आहे. भूअभिलेख पडताळणी, विमा हप्ता, नोंदणी, पोचपावती वितरण असे सर्व टप्पे ऑनलाइन झाल्याने पीकविमा योजनेत राज्याचे काम अव्वल बनले. ८० लाख शेतकऱ्यांनी नोंदणी करीत ४४४ कोटी रुपयांचा विमा हप्ता जमा झाल्याचे पोर्टलवर दिसते आहे.
देशात पीकविम्याच्या ऑनलाइन नोंदणीत दुसऱ्या स्थानावर ओरिसा आहे. मात्र, तेथील नोंदणी केवळ अवघी ७.२८ लाख झाली आहे. सर्वात निचांकी नोंदणी मेघालयात झाली आहे. तेथे फक्त एका शेतकऱ्याचा अर्ज अपलोड झाल्याने महाराष्ट्राची कामगिरी सध्या चर्चेत आहे. योजनेला मुदतवाढ मिळाल्याचा चुकीचा संदेश समाजमाध्यमांवर फिरत होता, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली.

२)मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात १०४ टक्के पावसाचा अंदाज
मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट ते सप्टेंबर) देशात १०४ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला. या अंदाजात ८ टक्क्यांची कमी अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
भारतीय हवामान विभागाने १५ एप्रिल रोजी मॉन्सून हंगामातील पावसाचा पाहिला अंदाज वर्तविला होता. यात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०० टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तर १ जून रोजी जाहीर केलेल्या सुधारीत अंदाजात देशात १०२ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
त्यानंतर काल हवामान विभागाने मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील (ऑगस्ट ते सप्टेंबर) महिन्याचा अंदाज जाहीर केला आहे. यानुसार देशात यंदाच्या मॉन्सून हंगामात १०४ टक्के पाऊस पडणार असून, ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पावसाचा अंदाज आहे. यात ९ टक्के तफावत होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.

वाचा:  वायदा बाजार अपडेट ०८ ऑगस्ट २०२०: सोयाबीन, हळद, आणि चण्याचे वायदे बाजारभाव !

३)२०१८-१९ मध्ये मंदीचा सामना केल्यानंतर कीडनाशक उत्पादन क्षेत्राने यंदा किंचित वाढ नोंदवली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार पंजाब, राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, छत्तिसगड आणि केरळ या राज्यांत कीडनाशकांचा वापर घटल्याचे दिसून येते. असे असले तरी महाराष्ट्र व उत्तर प्रदेशासारख्या आघाडीच्या राज्यांमध्ये कीडनाशकांच्या वापरात वाढ झाल्याने एकूण मागणीत वाढ दिसून आली. मजूर टंचाई व यांत्रिकीकरणावर या राज्यांतील शेतकऱ्यांचा भर असल्याचा हा परिणाम आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केरळ, आंध्र प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये कीडनाशकांच्या मर्यादित वापराबद्दल जागृती पाहायला मिळते. तर महाराष्ट्र हे कीडनाशक वापराच्या बाबतीत देशात आघाडीवर असल्याचे यातून दिसून येते.

वाचा:  युरियाच्या वापरावर केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

४)कर्नाटकातील कूत्तूर येथील काजू संशोधन संचालनालयाने काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवे अॅप तयार केले असल्याची माहिती शास्त्रज्ज्ञ मोहना जी. एस. यांनी दिली. हे अॅप महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि मेघालय या राज्यांतील काजू उत्पादकांसाठी तयार केले गेले आहे. एकूण ११ भाषांमध्ये हे अॅप उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. याद्वारे काजू पिकाच्या लागवडीपासून पणनापर्यंत सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. या अॅपच्या निर्मितीसाठी कृषी मंत्रालयाने अर्थसहाय्य केल्याचेही मोहना यांनी सांगितले.

वाचा:  शेतकऱ्यांसाठी भाजप मैदानात; पीक कर्जासाठी करणार ठिय्या आंदोलन

५)पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३१ ऑगस्टपर्यंत दर्शनासाठी बंद
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या सूचनेनुसार येत्या ३१ ऑगस्टपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे खबरदारीम्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर १७ मार्च ते ३१ जुलै २०२० या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा ३१ ऑगस्टपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येत असल्याचे समितीने म्हटले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App