संपुर्ण कर्जमुक्ती, दुष्काळी मदतीसाठी भाजपचे आंदोलन

ई ग्राम : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने संपुर्ण कर्जमाफी, दुष्काळी मदतीबाबत शब्द न पाळल्याबद्दल तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्यावतीने वऱ्हाडात प्रत्येक तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. अकोल्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. आंदोलन कर्त्यांनी यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन दिले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करीत असताना असताना शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे.

सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करु अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकरयांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. राज्यात या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. यासह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वऱ्हाडातील 26 तहसिल कार्यालये, तीन जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर दुपारपर्यंत धरणे दिले. यानंतर जिल्हाधिकारी, तहसिलादारांमार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले.

Read Previous

‘संपूर्ण कर्जमाफी द्यायला सरकारला ४०० महिने लागतील’

Read Next

बनावट पाणी परवाने देऊन केला अपहार