‘दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना वीजबिल भरण्यास सवलत द्या’

Smiley face < 1 min

चंद्रपूर : कोरोना काळात १०० युनिटपर्यंत माफीची घोषणा राज्य सरकारने केली. त्यामुळे अनेकांनी वीजबिल भरले नाही. आता ही रक्‍कम काही हजाराच्या घरात गेली असताना वीज कापली जात आहे. हा प्रकार चुकीचा असून, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना व्याज व दंड न आकारता १८ हप्त्यांत वीजबिल भरण्याची सवलत मिळावी, अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.

लॉकडाउन काळातील थकित वीजबिलापोटी सामान्य ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्यासह विश्रामगृहात बैठक घेतली. बैठकीला महापौर राखी कंचलार्वार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली.

वाचा:  कोकणात पावसाचा जोर ओसरला; हवामान खात्याची माहिती

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, शासनाने वीज ग्राहकांचा विश्‍वासघात केला आहे. आता वीजबिल काही हजारांच्या घरात गेल्यानंतर ते भरण्याची सक्‍ती केली जात आहे. प्रसंगी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. हा प्रकार सामान्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखा ठरतो आहे.

केशरी शिधापत्रिकाधारक वीज ग्राहकांना १२ महिन्यांचे १२ हप्ते पाडून बिल भरण्याची मुभा द्यावी, वीज खंडित करण्यापूर्वी १५ दिवसांत दोनदा नोटीस द्यावी, महावितरण उपविभागीय कार्यालयात माहिती कक्ष तयार करावा, १८ मर्च २०२१ पासून पुढील दहा दिवस वीज कनेक्‍शन कापू नये, पुढील आठ दिवस वृत्तपत्रांमध्ये योजनेची माहिती द्यावी, वसुली ८० टक्क्‍यांच्या वर असल्यास पुरवठा बंद करू नये, अशा सूचना आमदार मुनगंटीवार यांनी दिल्या.

वाचा:  ‘मराठा आरक्षणाबाबतची बैठक समाधानकारक’

दरम्यान, चालू बिलासहित जुने बिल थकीत असल्यास ग्राहकांनी एकंदर र‍कमेच्या ३० टक्‍के रक्‍कम भरून उरलेले बिल १२ महिन्यांत समान हप्त्याने एक टक्‍का व्याजासह भरावे, असे स्पष्टीकरण महावितरणचे मुख्य अभियंता देशपांडे यांनी या वेळी दिले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App