सूक्ष्म सिंचनासाठीच्या ४००० कोटींना मान्यता

Smiley face < 1 min

ई ग्राम : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठीच्या अंतिम ४००० कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाने दिली आहे. ‘प्रति थेंब, अधिक पीक’अंतर्गत विविध राज्य सरकारांना या निधीचे वितरण करण्यात येत आहे.

कृषी मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यमान (२०२०-२१) आर्थिक वर्षातील अंतिम ४००० कोटींच्या निधीस मान्यता देऊन यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संबंधित राज्य सरकारांना माहिती देण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. ‘प्रति थेंब, अधिक पीक’ या मोहिमेंतर्गत केंद्रीय कृषी मंत्रालय पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची अंमलबजावणी करीत आहे. या अंतर्गत शेती सिंचनासाठी सूक्ष्म सिंचनातील ठिबक, तुषार सिंचन व्यवस्थांद्वारे पाण्याचा काटेकोर वापर करण्यावर भर देण्यात येत आहे.

सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाद्वारे केवळ पाणीबचतच होत नसून, खतांचा कमी वापर, मजुरी आणि इतर निविष्ठांवरील खर्च कमी होत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)च्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनासाठी ५००० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पाच वर्षांत (२०१५-२०२०) पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत देशभरातील ४६.९६ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App