राज्यात १५ हजार एकरांवर बांबू लागवड; ‘अटल योजना’ आणि ‘बांबू मिशन’मधून प्रोत्साहन

Smiley face 2 min

नगर : जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु बांधावरील दुर्लक्षित असलेल्या बांबू शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून परिणामी राज्यात १५ हजार एकरांवर लागवड झाली आहे.

बांबू लागवडीला गती येण्यासाठी राज्यात अटल बांबू योजना व राष्‍ट्रीय बांबू मिशन योजनेतून लागवड केली जाते. आतापर्यंत राज्यात ६ हजार हेक्टरवर लागवड झाली असून त्यात दोन वर्षात ९८४ शेतकऱ्यांनी ६५६ हेक्टरवर अटल बांबू योजनेतून तर ५ हजार १८५ लाभार्थ्यांनी ५ हजार ३८१ हेक्टरवर राष्ट्रीय बांबू मिशन योजनेतून लागवड केली आहे. यात प्रामुख्याने कोकण, नगर, लातूर, उस्मानाबाद, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे जिल्ह्यात बांबूचे क्षेत्र वाढत आहे. राज्यात २०१९-२० मध्ये लक्ष्यांकानुसार एकूण ३ हजार ४८६ हेक्टरवर बांबू लागवड करण्यात आली होती. तर कोविडच्या महामारीमुळे २०२०-२१ मध्ये २ हजार ५५१ हेक्टरवर एकूण लागवडी झालेल्या आहेत.

egram

नाशिक विभागात आतापर्यंत ४८१ शेतकऱ्यांनी ४७० हेक्टर बांबू लागवड केली आहे. विभागात गेल्यावर्षी २ लाख ६ हजार आठशे, तर यंदा १ लाख ७४ हजार बांबू रोपांची लागवड झाली आहे. बांबू लागवडीसोबत महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाच्या माध्यमातून राष्‍ट्रीय बांबू अभियान अंतर्गत ‘कॅपिटल इन्व्हेसमेंट सबसिडी’ या योजनेतून बांबुवर आधारित खासगी बांबू उद्योग प्रकल्पासाठी अनुदान दिले जात आहे. त्यासाठी पन्नास टक्के अनुदान असेल. फर्निचर, इंधन, ऊर्जा, हस्तव्यवसाय, कृषी, निसर्ग पर्यटन, औषधी अन्न प्रक्रिया उद्योग, घरबांधणी आदी बाबींसाठी बांबू वापरला जातो. नगर, नाशिक भागातील शेतकऱ्यांना बांबू लागवड, वापर व अन्य बाबीची माहिती मिळावी यासाठी अभ्यासदौरेही केले जात आहेत.

वाचा:  जमीन भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न घेण्याची संधी; केंद्र शासनाद्वारे कुसुम योजना सुरु

नाशिक जिल्ह्यात देवगांव (ता. सुरगाणा) येथे आदिवासी बांबू कारागिरांसाठी बांबू मंडळामार्फत सामायिक सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. परिसरातील १५ बांबू कारागिरांना बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था चिंचपल्ली (चंद्रपूर) येथे दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण देण्यात आले. यासह आवश्यक यांत्रिकीकरण उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नगर जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग
नाशिक विभागात एकूण पाच बांबू प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. त्यातील नगर जिल्ह्यातील कर्जत, पारनेर या दुष्काळी तालुक्यात बांबू लागवडीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. कर्जत तालुक्यातील टाकळी खांडेश्वरी, जाफाबाद (ता. श्रीरामपूर) येथे अगरबत्ती तयार करण्यासह अन्य प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. पाच उद्योगासाठी एक कोटी दहा लाखाचा निधी असून त्यातील पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे. बांबुत सुबाभळीची लागवड हा राज्यातील पहिला प्रयोगही डॉ. दिलीप बागल यांनी कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे केला आहे.

वाचा:  खर्ड्यात उभारणार जगातील सर्वात उंच स्वराज्य ध्वज

आठ खासगी प्रक्रिया उद्योगांना मान्यता
बांबू लागवडपश्चात मंडळामार्फत राष्ट्रीय बांबू अभियान अंतर्गत भांडवल गुंतवणूक अनुदान योजनेंतर्गत राज्यात ८ खासगी बांबू उद्योग प्रकल्पांना नुकतीच मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी प्रकल्प किमतीच्या १० टक्के रक्कम स्वत: भरून ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात मंडळाकडून देण्यात येत आहे. तर उर्वरित ४० टक्के रक्कम किंवा अनुदानाव्यतिरिक्त रक्कम, बँक व वित्तीय संस्थांमार्फत कर्ज रूपात मिळणार आहे.

#plant bamboo हॅशटॅग मोहीम
विश्व बांबू संघटनेतर्फे चालुवर्षी #PlantBamboo असा नवीन हॅशटॅगची घोषणा करण्यात आली आहे. बांबू लागवड, महत्त्व व त्यासंबंधी उपक्रम व संधी यावर जनजागृती करण्यात येत आहे. बांबूसंबधी जनजागृती होण्यासाठी २००९ पासून दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी ‘जागतिक बांबू दिवस’ हा जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

वाचा:  राज्याच्या तापमानात चढ-उतार

बांबू योजनांची स्थिती अटल बांबू योजना
वर्ष–           लाभार्थी–    हेक्टर–   रोपांची संख्या
२०१९-२०      २८९      १७१.६       १,०२,६३७
२०२०-२१     ६९५       ४८५.८४     २,९१,५११
एकूण         ९८४         ६५६.९       ३,९४,१४८

राष्ट्रीय बांबू योजना
वर्ष–                लाभार्थी–            हेक्टर–          रोपांची संख्या
२०१९-२०           ३,५३२            ३३१६             १४,५६,६५६
२०२०-२१           १,६५३            २०६६               ८,४८,१४५
एकूण-              ५१८५              ५३८१               २३,०४,७९९

“बांबुचा समुचित विकास करणे व तसेच बांबूच्या क्षमतेचा सामान्य, गरीब जनतेला आर्थिक व सामाजिक विकास करून देश विकासाला चालना देण्याचे काम सुरू आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत.”
भास्करराव पवार, समन्वयक, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, नाशिक विभाग

“दुष्काळी भागासाठी बांबू फार फायदेशीर आणि शाश्वत उत्पन्न देणारे पीक आहे. मी स्वतः आठ एकरवर लागवड केली आहे. मागणी चांगली असल्याने लागवड करणे गरजेचे आहे. जागतिक बांबू दिनानिमित्त जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करावी अशी माझी अपेक्षा आहे.”
डॉ. दिलीप बागल, बांबू उत्पादक शेतकरी, नांदगाव, कर्जत, जि. नगर

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App