मुंबई – राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन येत्या १०० दिवसांत ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले बांधून पूर्ण करण्यात येतील, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात आजपासून ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ‘‘महाआवास अभियान-ग्रामीण’’ राबविले जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाआवास ग्रामीण अभियानामध्ये विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण योजनांतर्गत राज्यास एकूण १६ लाख २५ हजार ६१५ इतके घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, त्यापैकी ११ लाख २१ हजार ७२९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.
येत्या १०० दिवसांच्या अभियान कालावधीत उर्वरित ५ लाख ३ हजार ८८६ घरकुलांना मंजुरी देण्याचा मानस आहे. तसेच या लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये याप्रमाणे ७५० कोटी रुपये वितरित करण्यात येणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणार
घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसलेल्या राज्यातील सुमारे ७३ हजार लाभार्थ्यांची जागेची अडचण दूर करण्यासाठी अभियान कालावधीत विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी ५० हजारांपर्यंत अर्थसाह्य देण्यात येणार आहे. शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनासाठीची अतिक्रमणे नियमानुकूल करणे या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.
अभियानाची वैशिष्ट्ये
१) ग्रामीण भागात कामे वेळेवर आणि दर्जेदार होण्यासाठी ३३ हजार गवंड्यांना प्रशिक्षण तसेच साहित्य संच उपलब्ध करून देणार.
२) प्रत्येक पंचायत समितीच्या आवारामध्ये एक डेमो हाउसची निर्मिती करणार.
३) घरकुल लाभार्थ्यांना बँकेमार्फत ७० हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.