राज्य सरकारचा मोठा निर्णय! ‘पोल्ट्री व्यवसायिकांना ‘बर्ड फ्लू’ ची नुकसान भरपाई देणार’

Smiley face < 1 min

मुंबई – राज्यात ‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून, विविध टप्प्यांतील पक्षांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली.

यावेळी पशुसंवर्धन मंत्री केदार म्हणाले की, ‘बर्ड फ्लू’ रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या एक कि.मी. परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेल्या कोंबड्या व इतर पक्षी, अंडी आणि पक्षीखाद्याची नुकसानभरपाई देण्यासाठी व रोग नियंत्रणाच्या मोहिमेअंतर्गत १३० लाख रुपये मंजूर केले आहेत.

यात प्रामुख्याने आठ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे पक्षी २० रुपये प्रतिपक्षी, आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी ९० रुपये प्रतिपक्षी, सहा आठवडे वयापर्यंतच्या मांसल कोंबड्या २० रुपये प्रतिपक्षी, सहा आठवड्यावरील मांसल कोंबड्या ७० रुपये प्रतिपक्षी, कोंबड्यांची अंडी ३ रुपये प्रतिअंडे, कुक्कुट पक्षी खाद्य १२ रुपये प्रतिकिलोग्रॅम, सहा आठवडे वयापर्यंतचे बदक ३५ रुपये प्रतिपक्षी आणि सहा आठवड्यावरील बदक १३५ रुपये प्रतिपक्षी नुकसान भरपाई दिली जाईल.

दरम्यान, त्याचप्रकारे, बाधित क्षेत्राच्या एक कि.मी. परिघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट केलेले त्यांचे कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे केदार यांनी सांगितले.

अफवा पसरवू नये!
चिकन व अंडी हा प्रथिनांचा स्वस्तात उपलब्ध होणारा स्त्रोत आहे. ‘बर्ड फ्लू’बाधित क्षेत्र वगळून पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. कोंबडी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोर पालन करावे. ‘बर्ड फ्लू’बाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असे आवाहनही केदार यांनी केले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App