धान खरेदीला केंद्रशासनाकडून 31 जुलैपर्यंत मुदतवाढ -भुजबळ

Smiley face < 1 min

ई ग्राम : विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धान खरेदीला मुदतवाढ देण्याची राज्यशासनाने केंद्राकडे मागणी केलेली होती. त्यामुळे केंद्र शासनाने रबी हंगामातील धान खरेदीला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली इ. जिल्ह्यात रबी हंगामाचे उन्हाळी धान खरेदी करण्याकरिता शासनाकडून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. या शासकीय धान खरेदी केंद्रावर प्रशासनाकडून 30 जून पर्यंत धानाची खरेदी केली जाणार होती. मात्र यावेळी उन्हाळी धान पिकांचे विदर्भात मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान अजून त्यांच्याकडे पडून आहेत.

त्यामुळे शेतकरी संकटात सापडून त्यांचे आर्थिक नुकसान होणार होते. त्यामुळे धान खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती. धान खरेदीला मुदतवाढ देण्यासाठी छगन भुजबळ यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. केंद्र शासनाने धान खरेदीला मुदतवाढ दिल्यामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App