‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान

Smiley face < 1 min

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सलग चार पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या काही भागातील भात रोपे पाण्याखाली राहिल्यामुळे कुजली आहेत, तर काही शेतकऱ्यांचे भात बियाणेच वाहून गेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता दुबार भातरोपे तयार करावी लागणार आहेत.

जिल्ह्यात १२ जून ते १७ जून या कालावधीत मुसळधार पाऊस झाला. त्यात दोन दिवस अतिवृष्टी झाली. अनेक भागात पूरसदृश स्थिती झाली. बांदा, खारेपाटण आणि दोडामार्ग तालुक्यांतील काही गावांमध्ये पुराचे पाणी बाजारपेठेसह शेतीत शिरले. या भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी भात रोपे तयार केली होती.

वाचा:  दिलासादायक! उजनी धरणाची वाटचाल ३५ टक्केकडे

रोपांची वाढ देखील चांगली झाली होती. परंतु पुराचे पाणी सलग दोन दिवस भात रोपांवर साचून राहिले. त्यामुळे ही सर्व रोपे कुजून गेली तर काही शेतकऱ्यांची भात रोपेच वाहून गेली आहेत. रोपांकरिता घातलेले भात बियाणेच वाहून जाण्याचे प्रकार देखील सासोली परिसरात घडले आहेत.

भात रोपे, भात बियाणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता परत भात रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा जमिनीच्या मशागतीपासून सर्व कामे करावे, बियाणे खरेदी करावी लागणार आहे. या शिवाय शेतजमिनीत अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे तेथे भात रोपे तयार करताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे नेमके काय करावे, या चिंतेत शेतकरी आहेत.

वाचा:  महाडमध्ये भली मोठी दरड कोसळली; काही क्षणात होत्याचं नव्हतं

दरम्यान, सध्या पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पुन्हा भात रोपे तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. अतिवृष्टीचा भात रोपांसोबत अनेक भागातील ऊस शेतीला देखील तडाखा बसला आहे. खारेपाटण परिसरातील चिंचवली गावातील ऊस शेतीत पाणी घुसून नुकसान झाले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App