तांत्रिक कारणामुळे पूरग्रस्त मदतीपासून वंचित

Smiley face < 1 min

भंडारा : तुमसर तालुक्‍यात खरीप हंगामातील पिकांचे पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यापोटी शासनाने मदतीची घोषणा केली. त्यानुसार आतापर्यंत तालुक्‍यातील ४ हजार ५३३ पूरग्रस्तांना ३ कोटी ८१ लाख रुपयांच्या निधीचे थेट खात्यात वितरण करण्यात आले. मात्र त्यानंतरही ७५३ शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत.

गत खरीप हंगामात तुमसर तालुक्‍यातील नद्यांना मोठा पूर आला होता. नदीकाठावरील गावातील शेतकऱ्यांचे धान पीक उध्वस्त झाले होते. पुराचे पाणी शेतात साचून राहिल्याने अनेकांच्या शेतातील धान सडले. काहींच्या शेतात वाळूचा थर जमा झाला. परिणामी शेती नापिक झाली. पूरग्रस्तांची दखल घेत सत्ताधारी व विरोधकांनी या भागात भेटी दिल्या. शेतीचे पंचनामे झाले. त्यातही बराच कालावधी निघून गेला.

egram

नुकसान भरपाईपोटी शासनाने ४ कोटी १४ लाख रुपये मंजूर केले. यातील बहुतांशी रक्‍कम बाधितांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यात ४ हजार ५३३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. परंतु त्यानंतरही ७५३ शेतकरी तांत्रिक कारणांमुळे भरपाईपासून वंचित राहिले आहेत. त्यांच्या बॅंक खात्यांमध्ये तफावत असल्याचे सांगितले जाते. संबंधित शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडे या संदर्भाने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, तुमसर तालुक्‍यात वाहणाऱ्या वैनगंगा आणि बावनथडी नदीला आलेल्या महापुरामुळे पिकाचे नुकसान झाले होते. महापुरामुळे तुमसर तालुक्‍यातील अनेक घरांची पडझड झाली होती. काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरून नुकसानीची नोंद करण्यात आली. १४०० कुटुंबीयांना याचा फटका बसला होता. या कुटुंबीयांच्या खात्यावर ७० लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App