महाराष्ट्राच्या दूध उद्योगावर परराज्यांतील संघांचे वर्चस्व

Smiley face < 1 min

पुणे : परराज्यांतील दूध संघांनी महाराष्ट्रात दूध संकलनात मोठी आघाडी घेतली आहे. पिशवीबंद दुधाच्या बाजारपेठेचा किमान पन्नास टक्के वाटा परराज्यांतील संघांच्या ताब्यात गेला आहे. अमूलने राज्याच्या दूध व्यवसायावर वर्चस्व निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. त्या पाठोपाठ नंदिनी, पंचमहाल, तिरूमला आदी दूध संघांचाही व्यवसाय विस्तार वाढत आहे.

कोरोना महामारीच्या काळात राज्यातील सहकारी संघांची दूध विक्री घटली असताना अमूलने मात्र व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन दूध विक्री वाढवण्याचे उद्दीष्ट ठेवले. परिणामी एकट्या मुंबईत अमूलच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत तब्बल १५ टक्के वाढ झाली, अशी माहिती इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरूण नरके यांनी दिली.

वाचा:  कुख्यात गुंड विकास दुबेचा अखेर पोलिसांकडून खात्मा

प्रचंड आर्थिक ताकद,  देशभर असलेले विक्री व्यवस्थेचे जाळे आणि संपूर्ण व्यावसायिक व्यवस्थापन याच्या जोरावर अमूलने महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली. राज्यातील स्थानिक सहकारी दूध संघ व्यावसायिक पध्दतीने न चालवता राजकारणाचे आखाडे झाल्यामुळे दूध चळवळीला उतरती कळा लागली.

मोजके अपवाद वगळता राज्यातील दूध उद्योग अकार्यक्षमता आणि गैरव्यवहारांमुळे बदनाम झाला आहे. अनेक ठिकाणी कमी गुणवत्तेचे दूध स्वीकारणे, भेसळ करणे, शेतकऱ्यांना कमी दर देणे, डीलर कमिशन भरपूर ठेवणे या प्रकारांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

वाचा:  पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहिर, काय सुरू काय बंद?

मूल्यवर्धित उत्पादनांच्या क्षेत्रात उतरण्याची कल्पकता आणि पायाभूत सुविधांची उभारणी यामध्ये राज्यातील सहकारी दूध चळवळ कमी पडली. अमूल प्रमाणे राज्याचा एकच ब्रॅंड नसणे, मोडकळीस आलेला महानंद  दूध खरेदी दरात तफावत, केवळ पिशवीबंद दूध विकण्यावर भर, दूध संघांतील अंतर्गत स्पर्धा व लाथाळ्या यामुळे महाराष्ट्रातील दूध उद्योगाला घरघर लागली आहे.

दुधाच्या क्षेत्रात स्पर्धेचे वातावरण निर्माण झाल्यास शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा फायदा होणार आहे. परंतु विषम स्पर्धेमुळे सहकारी दूध चळवळ संपुष्टात आली तर परराज्यांतील दूध संघांची मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा मक्तेदारीमुळे शेतकऱ्यांची अडवणूक होण्याचा धोका आहे.

वाचा:  ... यामुळे पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंद

दरम्यान, याचे ग्रामीण महाराष्ट्रावर गंभीर, आर्थिक व सामाजिक परिणाम होतील. यामुळे राज्यातील दूध संघांनी या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी एकजूट दाखवावी आणि राज्य सरकारने त्यांना भक्कम पाठबळ द्यावे, अशी भावना या क्षेत्रातील घटकांनी व्यक्त केली.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App