कच्ची घाणी तेल आरोग्यासाठी एक चांगला पर्याय

ई-ग्राम : किचनमध्ये कुकिंग ऑइलचे महत्व सर्वाधिक असून फोडणी देण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत सर्व गोष्टीसाठी तेल गरजेचे असते. तेल आणि आरोग्याचा देखील जवळचा संबंध आहे त्यामुळे आपण कोणते खाद्य तेल आहारात वापरायला हवे हे महत्वाचे ठरते. आपल्या देशात फार पूर्वी पासून लाकडी घाण्यावर तेल काढण्याची पद्धत होती. यामध्ये तेलबिया लाकडी घेण्यात घालून त्याचे चर्वण करून कुठलीही रासायनिक प्रक्रिया न करता नैसर्गिकरित्या काढलेले स्वच्छ तेल मिळायचे. या तेलामध्ये कुठलीही रासायनिक प्रक्रिया केलेली नसल्यामुळे हे तेल चवीसाठी आणि खाण्यासाठी सर्वोत्तम मानले जायचे.

घाण्यामध्ये काढलेल्या तेलात अनेक प्रकारचे पोषक घटक आणि आवश्यक खनिजे नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. पण, रिफाइनड तेल जास्त प्रमाणात वापरात आल्यापासून लाकडी घाणीचा वापर कमी झालेला दिसून येत आहे. १९ व्या शतकामधे जवळपास सर्व प्रकारचे तेल हे लाकडी घाणीच्या साह्यानेच काढले जात असे. आता सध्या, फक्त ५ टक्के एवढेच प्रमाणात तेल हे घाणी मधून काढले जाते. औद्योगिकरण व तेल काढण्यासाठी नवीन यांत्रिक पद्धती वापरात आल्यामुळे लाकडी घाणीचा वापर कमी झाल्याला दिसून येतो. परिणामे गावा गावात पूर्वी चालणारे लाकडी घाणे बंद पडले. जे तेल पूर्वी डोळ्यासमोर काढून मिळायचे ते आता कुठेतरी कारखान्यात तयार होऊन चकाचक, आकर्षक पॅकिंग मध्ये मिळू लागले. या तेलाचा रंग, वास, चव सगळंच हरवलं आहे. हे बाजारात मिळणारं यांत्रिक पद्धीतीने काढलेले तेल ज्यावर उच्च प्रमाणात रासायनिक प्रक्रिया केलेली असते. पण स्वास्थ्याबद्दल वाढलेली लोकांची जागरूकता यामुळे कच्ची घाणी तेलाची मागणी अजून वाढलेली दिसून येत आहे.

भारतात शेकडो वर्ष्यांपासून तेलाचा वापर विविध प्रकारे केला जातो, तसेच विविध अन्नपदार्थ प्रक्रियेमध्ये केला जातो. कच्ची घाणी तेल म्हणजे लाकडी घाणीचा वापर करून तेलबिया पासून कमी तापमानाला काढलेले तेल. याच पद्धतीला “कोल्ड प्रेसिंग” असे म्हणतात. भारतात वेगवेगळ्या भाषेत व वेगवेगळ्या ठिकाणी तेल काढण्याच्या या लाकडी उपकरणाला “घाणी”, “चेक्कू” किंवा “कोहलु” अश्या अनेक नावाने संबोधले जाते.

लाकडी घाण्यामध्ये तेलबिया टाकून कोणत्याही रासायनिक पद्धतीचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. या प्रक्रियेमध्ये कमी तापमानाला तेल काढण्यात येते, व तेल काढताना जी काही उष्णता निर्माण होते ती मोठ्या प्रमाणात काकडमध्ये शोषून घेतली जाते. या पद्धतीने तयार केलेल्या तेलामध्ये मानवी शरीराला आवश्यक असलेले नैसर्गिक घटक नष्ट होत नाहीत.

या पद्धतीने काढलेले तेल हे उच्च प्रतीचे व आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. तेलात मुख्यतः दोन प्रकारचे घटक असतात एक म्हणजे ज्यामुळे तेलाला चिकटपणा येतो, त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे स्निग्ध आम्ल, जीवनसत्व-ई आणि खनिजे सुद्धा मुबलक प्रमाणात असतात. तसेच, घाणीच्या तेलाला एक विशिष्ट सुगंध असतो, हा सुगंध त्यामधील असणाऱ्या प्रथिनांमुळे येतो. तसेच ते विविध नैसर्गिक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानले जाते. लाकडी घाणीतून काढलेल्या तेलामध्ये संतृप्त स्निग्ध आम्ल, प्रथिने आणि जीवनसत्व अ, ड आणि ई मध्ये समृद्ध असतात, जे कि घातक चरबी कमी ठेवण्यास मदत करते.

कच्ची घाणी तेलाला बाजारात चांगलीच मागणी आहे. कारण, रिफाईंड तेलाच्या तुलनेत या तेलाचा नैसर्गिक सुगंध व आवश्यक पोषक घटकांचे प्रमाण उत्तम आहे. या तेलाचा वापर रोजच्या आहारात खाण्यासाठी, पदार्थ तळण्यासाठी, तसेच विविध खाद्य पदार्थांमध्ये केला जात आहे जसे कि, लोणचे, चटणी, ब्रेड इ. रिफाईंड तेलाच्या तुलनेत घाणीचे तेल हे कमी प्रमाणात लागते. घाणीच्या तेलाचा वापर भाजी बनविण्यासाठी किंवा इतर अन्नपदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

लाकडी घाणीमधून तेल काढण्याची पद्धत:
विविध तेलबिया उदा. सेंगदाना, सूर्यफूल, करडई, तीळ, मोहरी व जवस इ. पासून लाकडी घाणीमधून तेल काढले जाते. सर्वात अगोदर तेलबिया चाळणीने चाळुन स्वच्छ करून घ्याव्यात, जेणेकरून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा, किंवा अशुद्ध घटक नसू नये. स्वच्छ केलेल्या तेलबियांना लाकडी घाणीमधून चिरडून त्यामधून सुद्ध तेल काढले जाते. लाकडी घाणीमधून तेल काढताना कमी दाब व तेलाचे तापमान ४५ अंश. से. पेक्षा कमी असते. या पद्धीतेने कमी तापमानाला काढलेल्या तेलाच्या रंग, चव, सुगंध, अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असे नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात.
रिफाईंड तेलाच्या तुलनेत घाणीच्या तेलाचे फायदे

घाणीचे तेल रिफाईंड तेल
१) पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तेल काढले जाते १) विविध यंत्राच्या साह्याने तेल काढले जाते
२) या प्रक्रियेमध्ये कोणत्याही रासायनिक घटकाचा वापर केला जात नाही २) तेल काढताना विविध रसायनांचा वापर केला जातो
३) नैसर्गिक पद्धतीने शुद्धीकरण केले जाते ३) तेलाचे रासायनिक प्रक्रिया करून शुद्धीकरण केले जाते
४) यामध्ये १००% नैसर्गिक व जैविक घटक असतात ४) तेलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जाते
५) नैसर्गिकरित्या पोषक घटक टिकून राहतात ५) आवश्यक पोषक घटकामध्ये लक्षणीय घट होते
६) कमी तापमानाला तेल काढले जाते ६) तेल काढताना उच्च तापमानाचा वापर केला जातो
७) तेलाला नैसर्गिक चव, रंग आणि सुगंध असतो ७) तेलाचा रंग, चव आणि सुगंध व इतर गुणधर्म सुधारण्यासाठी विविध रासायनिक प्रक्रियांचा वापर केला जातो
८) घाणीचे तेल रिफाईन्ड तेलाच्या तुलनेत कमी प्रमाणात लागते ८) पदार्थामध्ये अधिक प्रमाणात वापरावे लागते

तेल काढल्यानंतर उरलेल्या पेंढीचा उपयोग : जनावरांना खाद्य म्हणून वापर विविध अन्न पदार्थामध्ये पोषण पूरक घटक म्हणून उपयोग करता येतो वरील सर्व फायदे लक्ष्यात घेता स्वयंपाक घरात कच्ची घाणी शुद्ध तेल वापरणे हे आरोग्यासाठी आवश्यक ठरते. तसेच, तेल काढण्यासाठी लाकडी घाणीचा वापर वाढावा तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यासाठी “खादी ग्राम उद्योग आयोग” द्वारे सुधारित लाकडी घाणी उपलब्ध आहेत, तसेच त्यासाठी भारत सरकारकडून व जिल्हा उद्योग केंद्राकडून गृहउद्योगासाठी अनुदान सुद्धा मिळू शकते.

संपर्क
डॉ. रवींद्र काळे
प्राचार्य, एम. जी. एम. अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद.
मो. ९५११२९४०७४

Read Previous

जिल्हा परिषदेतील ‘अनुकंपा’साठी मंगळवारी कागदपत्रांची पडताळणी

Read Next

हापूस निर्यातीत घसरण