कोल्हापूर : जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूर बाधित शेतकरी लाभार्थ्यांनाही डॉ. पंजाबराव देशमुख व्याज माफी योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे महापूर आला होता. या महापूरात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बाधित क्षेत्रावरील पीककर्ज महाराष्ट्र शासनाने माफ केले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील ९२ हजार, दोनशे एक शेतकऱ्यांची ही रक्कम तब्बल २६८ कोटी रुपये होती.
या कर्जमाफी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे सरकारने जाहीर केले होते. दरम्यान ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी योजनेचा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांनी उर्वरित पीक कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड केली होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रोत्साहनपर तीन टक्के व्याज परतावा योजनेप्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देणे आवश्यक असले बाबत बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत ३१ ऑक्टोबर २०२० रोजी ठराव केला होता.
या ठरावाचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावाही बँकेने केला होता. बँकेच्या ५ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या ८२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही ठरावाद्वारे शासनाकडे ही मागणी केली होती.
दरम्यान, बँकेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची ही मागणी मान्य करून अंशतः कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित कर्जफेड रकमेवर डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र केले आहे.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.