‘या’ जिल्ह्यातील ६४५ गावांवर भीषण पाणीटंचाईचे सावट

Smiley face 2 min

अमरावती : उन्हाच्या तीव्रतेसोबतच जिल्हयातील काही गावांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला जातो. यावर्षी पहिल्या टप्प्यातील आराखड्याची गरज भासली नसली तरी दुसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांची गरज भासणार असे संकेत आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत ६४५ गावांमध्ये पाणीसंकट निर्माण होण्याची शक्‍यता पाहता प्रशासनाकडून १५ कोटी २ लाख ६८ हजार रुपयांच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

जिल्हयातील काही गाव, वस्त्यांना दरवर्षी पाणीटंचाईचे चटके बसतात. त्याकरिता जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा दोन टप्प्यात उपाययोजना केल्या जातात. पाणीटंचाईची तीव्रता पाहता उपाययोजनांवर भर दिला जातो. यावर्षी पहिल्या टप्प्यात पाणीटंचाई जाणवली नाही. परंतू दुसऱ्या टप्प्यात ती अधिक तीव्र होण्याची भिती आहे.

वाचा:  राज्यातील पावसाचा जोर कमी होणार

जानेवारी ते जून या कालावधीत पाणीटंचाई निवारणार्थ १५८८ गावांपैकी ६४५ गावात १२२ उपाययोजना प्रस्तावीत करण्यात आल्या होत्या. या आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरी प्रदान केली आहे. त्यामध्ये विंधन विहिरी, विहिरींचे अधिग्रहण, तात्पूरती पूरक नळ योजना, टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने पाणीपुरवठा, विहिर खोलीकरण, रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेणे अशा कामांचा समावेश आहे.

मेळघाटातील दुर्गम धारणी, चिखलदरा या दोन तालुक्‍यांना पाणीटंचाईची सर्वाधीक झळ दरवर्षी बसते असा अनुभव आहे. चिखलदरा तालुक्‍यातील एकझिरा, सोनापूर, कोयलारी, पाचडोंगरी, सोमवारखेडा, मनभंग, मोथा, कोरडा या गावात दरवर्षी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. गेल्यावर्षी मेळघाटातील २४ गावांमध्ये २५ टॅंकर सुरु करण्यात आले होते. या गावांसह गैरआदिवासी बारा तालुक्‍यातील गावांना ३० ते ४० टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो.

वाचा:  संभाजीराजेंनी उद्या मुंबईला यावं, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री भेटायला तयार; सतेज पाटलांचं निमंत्रण

दरम्यान, सद्यस्थितीत टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासारखी परिस्थिती जिल्हयात कोठेही नसली तरी १४ गावात विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्हयात पाणीटंचाई निवारणार्थ १५ कोटी २ लाख ६८ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरी दिली आहे. त्या अंतर्गंत २२१ पाणीपुरवठा योजनाची दुरुस्ती केली जाणार आहे. याशिवाय ९४ नवीन कुपनलिका केल्या जातील. मोर्शी, वरुड, दर्यापूर हे तालुके वगळता अन्य बारा तालुक्‍यात या कुपनलिका प्रस्तावित केल्या आहेत.

वाचा:  कोकणात पावसाचा धुमाकूळ; मराठवाड्यात पेरण्या खोळबल्या

एकूण गावे – १५८८
पाणीटंचाई संभावीत गावे – ६४५
बोअरवेलचे होणार खोदकाम – ९४
पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती – २२१

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App