कालवे “म्हैसाळ’च्या पाण्याच्या प्रतीक्षेत

Smiley face < 1 min

ई ग्राम , सलगरे, जि. सांगली (प्रतिनिधी) ः म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळी आवर्तनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मागणी अर्ज भरून घेण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून गावनिहाय बैठका सुरू करण्यात आल्या आहेत.मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यांतील काही भाग आणि जत या तालुक्‍यातील दुष्काळाची तीव्रता कमी करणारी म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून आदेश प्राप्त झाले. त्यानंतर पाणी सोडण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कालव्याचे अस्तरीकरण, काटेरी झुडुपे जेसीबीच्या साहाय्याने काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. योजनेच्या प्रत्येक टप्प्यातील विद्युत मोटरी आणि विद्युत पुरवठा सुरळीत आहे, का नाही, याची तपासणी विद्युत विभागाकडून करण्यात येत आहे. खराब विद्युत मोटरी काढून काही ठिकाणी नवीन मोटरी बसवण्याचे काम सुरू आहे. म्हैसाळ, आरग, (लांडगेवाडी) सलगरे, डोंगरवाडी सलगरे येथील मुख्य पंपहाउसमधील विद्युत मोटरी व कालवा दुरुस्ती आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे.

वाचा:  पारनेर येथे अवैध दारूअड्डा चालविणाऱ्या कृषी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

सध्या पाटबंधारे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून गावनिहाय पाणी मागणी अर्ज भरून घेण्याचे काम सुरू केले आहे. पाणीटंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडून त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सलगरे, बेळंकी, कदमवाडी, डोंगरवाडी, संतोषवाडी, जानरावाडी, खटाव, लिंगनूर, शिपूर, कोगनोळी, कुकटोळी, करोली परिसरातील द्राक्षबागांच्या खरडछाटण्या, खोडवा ऊस, मका व भाजीपाला, कलिंगड यांना पाणी कमी पडत असल्याने या भागातील शेतकरी म्हैसाळच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

वाचा:  शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ठिबक अनुदानासाठी १९१ कोटी रुपये मंजूर

मागणी अर्ज द्या : पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. सध्या उन्हाळी आवर्तनासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीटंचाई असल्याचे ठराव घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीतर्फे शेतकऱ्यांना पाणी मागणीचे अर्ज देण्यासाठी गावपातळीवर आवाहन करण्यात येत आहे, असे खंडेराजुरी येथील उपकालवा शाखा अभियंता सावंत यांनी सांगितले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App