शेतकऱ्यांना सन्मान हवा !

Smiley face 2 min

ई ग्राम : आपला देश कृषिप्रधान आहे. तसं आम्ही अभिमानाने पण सांगतो. अन् तो अभिमान सार्थ पण आहे. या देशाची आर्थिक घडी पूर्णपणे कृषी वर अवलंबून आहे. या देशातील अंदाजे साठ सत्तर टक्के लोकांचं पोट प्रत्यक्ष शेतीवरच भरते. उरले तीस चाळीस टक्के लोक अप्रत्यक्षपणे शेतीशी निगडित आहेत. म्हणजे शेती पिकली नाही तर ते बाधित होतात पण ते होरपळून निघत नाहीत ! तग धरून राहतात. शेतकरी मात्र दुष्काळाच्या धगीत भाजून कोळसा होतो. देशात दुष्काळ पडला तर व्यापार, उद्योगासहित सर्व भरडून निघतात. मग असं असताना साहजिकच प्रश्न निर्माण होतो की या देशात शेती अन् शेतकरी किती महत्त्वाचा घटक आहे ? जो देशाचा कणा आहे, जो देशाचा तारणहार आहे, त्याचा रुबाब किती असावा ?
प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे काय हाल आहेत आपण बघतोच.

प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे काय हाल आहेत आपण बघतोच. इथं जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्याखाली शेतकरी विरोधी कायदे कसे राबवले जातात हेही आपण जाणतोच. आपण इथंच थांबत नाही तर पुढे जाऊन शेतकऱ्यांचा अपमान सुध्दा करतो. त्याला अडाणी म्हणून हिणवतो ! नासमज म्हणून बतावणी करतो. त्याला बिचारा म्हणतो. भिकारी ठरवतो ! हे खूप भयंकर आहे. अगदी शेतकरी विरोधी कायदे व सरकार तथा भांडवलदारांच्या कटकारस्थानापेक्षाही हे समाजाचं वागणं मला एक शेतकरी पुत्र व शेतकरी म्हणून खूप भयानक वाटते. मला आठवते, ब-याच वर्षांपूर्वी मी नागपूर वरून, माझ्या ताई कडून सपत्नीक येत होतो. ट्रेन मध्ये माझ्या समोर एक सुटाबुटातले सद्गृस्थ बसले होते. त्यांनी आमच्या कडे बघून अंदाज लावला की जोडपं नवविवाहित दिसते, पोरगा चांगला इंजिनिअर डॉक्टर दिसतो ! ते माझ्या सोबत खूप आदराने अन् मन लावून बोलत होते. सर्व विषयांवर चर्चा करण्यात अगदी दंग होऊन गेले होते ! पण अशात त्यांनी मला, आपण काय करता विचारलं ? त्यावर मी बिनदिक्कतपणे शेती करतो सांगितलं ! अन् काय चमत्कार त्या सद्गृहस्थांनी एकदम खिडकीतून बाहेर नजर वळवली, ते मी थेट अकोल्यात उतरलो तरी माझ्या कडे निरोपा दाखल देखील फिरकली नाही हो !

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा, टोमॅटो, कापूस, सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

आज शेती करणं हा शेवटचा पर्याय म्हणून वापरला जातो. शेती कुणीच प्राधान्य क्रम म्हणून आनंदाने करत नाही. शेतकरी आपल्या पाल्याला शहरात पाठवून शक्यतोवर दुसरं काही तरी करायला लावतो. नाहीच काही जमलं तर नाईलाजाने शेती करायला लावतो. वास्तविक शेती करायला खूप डोकं लागतं ! खूप आवाका असावा लागतो. समयसूचकता लागते, तुमचं डोकं सतत सतर्क असावं लागतं.थोडक्यात शाळेतल्या शब्दबंबाळ, थेरॉटीकल अभ्यासाव्यतिरिक्त इथं सर्व कसब पणाला लागतं ! पण होतं काय की शाळेत मेरीट येणाराला इथं सर्व मिळतं. पण त्याहून कठीण प्रत्यक्ष शेतीवरचे यशस्वी प्रयोग करणारा मात्र काहीच भेटत नाही. आपली शाळा कॉलेजं खरं तर मुलांच्या दिमाखाची एकच खिडकी मोजतात ! निसर्गतः आपल्या दिमाखाला हुशारीच्या असंख्य खिडक्या आहेत ! पण त्यांचं मोजमाप करणारी शाळा आपल्या कडे अद्याप उघडायची बाकी आहे ! म्हणून आज यशस्वी शेती करणारा, लहरी निसर्गावर मात करून, त्याच्या अगम्य हवामानाचा अभ्यास करत भरसाठ अन्नधान्य पिकवणारा शेतकरी अडाणी ठरतो ! व स्वत: चा पंख्याखालचा टेबल नीट न सांभाळणारा कृषितज्ज्ञ म्हणून मिरवतो !

वाचा:  जिल्हा परिषदेमार्फत पाझर तलांवामध्ये मत्स्यउत्पादन प्रकल्प राबविणार - रणजित शिवतरे

वास्तविक शेतीतलं तंत्र शेतकऱ्याएवढं कुणालाच अवगत नाही. फक्त गरज आहे ती शेतकरी मागतो ते यंत्र सामग्री त्याला पुरवण्याची. जे पिकाचे वाण संशोधन करून त्याला हवेत ते द्या, भरघोस उत्पन्न तो काढतोच ! काही वाण अन् यंत्र तर तो स्वत: संशोधित करतो ! मी मागच्या एका लेखात त्याचा विस्तृत ऊहापोह केला आहे. पण इथं समस्या काय आहे ? शेतकरी सिंचनासाठी पाणी मागतो पण आपण त्याला फवारणी कशी करायची ते शिकवतो ! तो गहू हरभरा पिकवतो, आपण त्याला फळबाग लावण्याचा सल्ला देतो ! अरे बाबा त्याच्याकडे प्यायला पाणी नाही ! सिंचन काय करंगळी वर करून करील ? शेतमजूर गावातच बारमाही रोजगार मागतो, सरकरी लोक त्याला बक्कर तगाई देऊन समजावतात ! अहो त्याला उद्योगचं अंगं नाही, तो उत्तम प्रकारचा श्रमिक आहे. त्याला तसा रोजगार पुरवा. पण तसं होत नाही. आपल्या कडे तसा रिवाजच नाही. आपल्याकडे नेहमीच, रोग हेल्याले अन् इंजेक्शन पखालीले, अशी पध्दत आहे ! म्हणून सर्व घोळ आहे.

वाचा:  ३० जूननंतरही लॉकडाऊन कायम! वाचा मुख्यमंत्र्यांच्या संवादातील ठळक मुद्दे

पुष्पराज गावंडे

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App