फळे, भाजीपाला उत्पादक धास्तावले

Smiley face < 1 min

नांदेड : जिल्ह्यात मागील सहा-सात दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून रुग्ण संख्या दुप्पट झाली आहे. यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन झाला तर मागील वर्षीसारखे हाल होतील, या भीतीने फळ, भाजीपाला उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

जिल्ह्यात मागील आठवड्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दुप्पटीने वाढला आहे. आठ दिवसांपूर्वी एका दिवसात वीसपर्यंत आढळणारे रुग्ण सध्या दररोज शंभरपेक्षा अधिक येत आहेत. रविवारी (ता.७) तब्बल २२९ रुग्ण आढळून आल्याने प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

egram

मागील सहा दिवसांत जिल्ह्यात तब्बल ४४८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे प्रशासनानेही खबरदारी म्हणून उपाययोजना लागू केल्या आहेत. यापुढेही रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊन होऊन सर्व व्यवहार ठप्प होतील, अशा शक्यतेने सामान्य नागरिक दबावात आले आहेत.

दरम्यान व्यवहारावर प्रतिबंध आले तर सर्वाधिक नुकसान होईल, या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. सध्या उन्हाळा सुरू असल्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कलिंगड, खरबूज बाजारात येत आहेत. यासोबतच भाजीपालाही शेतकरी बाजारात आणत आहेत. या काळात मागील वर्षी सारखा लॉकडाऊन लागू केला तर सर्वाधिक फटका फळे व भाजीपाला उत्पादकांना बसेल, अशा शक्यतेने शेतकरी धास्तावले आहेत.

दरम्यान, प्रशासनाने व्यवहारावर प्रतिबंध घालताना शेतकऱ्यांचा माल विक्री करण्यासाठी अडचण येणार नाही, याची दखल घेण्याची मागणी लोहा तालुक्यातील पार्डी येथील टरबूज उत्पादक पंडित पवार या शेतकऱ्यांनी केली आहे. मागील आठवड्यात हिंगोली जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाऊन लागू केला होता. यामुळे हिंगोलीतील टरबूज उत्पादक शेतकरी नांदेडला टरबूज विक्रीसाठी आले होते.

“सध्या शेतकऱ्यांचा टरबूज, खरबूज अशा फळांसह भाजीपाला विक्रीसाठी बाजारात येत आहे. यावेळी लॉकडाऊन लागू करताना प्रशासनाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी.”
भगवान इंगोले, मालेगाव, ता. अर्धापूर

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App