गुवाहाटी – आसाम विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात होत असून भाजपला रोखण्यासाठी स्थानिक पक्ष एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. आसाम जातीय परिषद (एजेपी) चे अध्यक्ष लुरिनज्योति गोगोई यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अखिल गोगोई यांच्या रायजोर दलाशी आघाडी केली आहे. अखिल गोगोई हे सीएए कायद्याच्या विरोधात असून यात त्यांना तुरुंगवासही झाला आहे.
गुवाहाटी वैद्यकीय कॉलेज आणि रुग्णालयात अखिल गोगोई आणि लुरिनज्योति गोगोई यांच्यात सुमारे अडीच तास चर्चा झाली. यानंतर विद्यार्थी संघटनेचे माजी नेते लुरिनज्योति यांनी दोन प्रादेशिक पक्षांत आघाडी झाल्याचे सांगत याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होईल, असे सांगितले. गोगोई यांच्यावर सध्या जीएमसीएच येथे उपचार सुरू आहेत. यादरम्यान रायजोर दलाने गेल्या आठवड्यात लुरिनज्योति यांना पत्र लिहून उभय पक्षात आघाडी करण्याची मागणी केली होती.
लुरिनज्योति यांनी सांगितले की, भाजपविरोधात एकत्ररित्या सामना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार आज आघाडी केली असून दोन्ही दलाच्या नेत्यांच्या उपस्थितीत घोषणा केली जाईल. एजेपीची बोडोलँड पीपल्स फ्रंटसमवेतही चर्चा सुरू असून ती चर्चा सकारात्मक दिशेने जात असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, लुरिनज्योति म्हणाले, की कार्बी आंगलोगसाठी ऑटोनॉम स्टेट डिमांड कमेटीबरोबर अगोदरच करार झाला आहे. आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष गणशक्ती आणि राभा हसोंग यांच्यासमवेत आघाडी करण्याचा विचार करत आहे. आम्ही राजकारणात सक्रिय असणाऱ्या जातीय दलांची आघाडी करू इच्छित आहोत.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.