कोरोनाच्या किती टेस्ट होतात, आणि कोणत्या? वाचा सविस्तर

ई ग्राम : सध्या देशात कोरोना महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. रुग्णांच्या संख्येत घट होत आहे की या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे, हे येत्या काही आठवड्यांमध्ये ठरणार आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना संशयित रुग्णांपासून वेगळे ठेवण्यासाठी झटपट व प्रभावी चाचणी हा एकच उपाय आहे.

सध्या कोरोनाबाबत महत्त्वाच्या असणाऱ्या तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. यात व्यक्तीच्या नाकपुड्या किंवा घसा यातून स्वॅबने सॅम्पल घेणे, रॅपिड डायग्नॉस्टिक टेस्ट आणि रक्त चाचणी. पहिल्या चाचणीमध्ये स्वॅब नमुने घेतले जातात. आणि व्हायरल ट्रान्स्पोर्ट मीडिअम (व्हीटीएम) कंटेनरमधून हे नमुने चाचणी केंद्राकडे पाठवले जातात.

खासगी रुग्णालयांची भूमिका सध्या नमुने गोळा करण्यापुरती आणि हे नमुने जवळच्या चाचणी केंद्राकडे पाठवण्यापुरती मर्यादित आहे. तसेच, खासगी डायग्नॉस्टिक लॅबोरेटरीजना होम-टेस्टिंगची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये, रुग्णांना घरबसल्या चाचणी करून घेता येते.

दुसरा पर्याय असणारी, रॅपिड डायग्नॉस्टिक टेस्ट ही फिंगरप्रिक ग्लुकोज टेस्टिंगसारखी असते. या चाचणीमध्ये, फिंगरप्रिक टेस्ट करून एक थेंब रक्त घेतले जाते, हे रक्त टेस्टिंग डिव्हाइसवर ठेवून चाचणी केली जाते. याचा निर्णय समजण्यासाठी अर्धा तासाचा अवधी लागतो. तूर्तास, ही सुविधा भारतामध्ये उपलब्ध नाही. ही सुविधा लवकरच भारतामध्ये उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

तिसरा पर्याय म्हणजे, सर्वसाधारण रक्त चाचणी. यामध्ये, रक्ताचे नमुने घेतले जातात आणि चाचणी केंद्रांमध्ये या नमुन्यांची चाचणी केली जाते. यातून विषाणूसाठी अँटिबडीजची तपासणी केली जाते. ही चाचणीही सध्या भारतामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे त्यासाठीचा खर्च अद्याप माहीत नाही.

कोरोनाची चाचणी करत असताना, विषाणू शौचापर्यत पोहोचला आहे की, हे तपासण्यासाठी शौचाचे नमुनेही घेतले जातात. परंतु, यावरही सध्या अभ्यास केला जात आहे आणि विषाणूचा संसर्ग झाल्याची खातरजमा करण्यासाठी शौचाचे नमुने पाठवायचे का, हे ठरवण्यासाठी थोडा कालावधी गरजेचा आहे.

Read Previous

कोरोनाच्या टेस्ट करण्यासाठी किती येतो खर्च? वाचा सविस्तर

Read Next

डॉक्टरला होता कोरोना, हजार लोकं संपर्कात