पुणे – सरकारने इराणवरुन ६०० टन कांद्यांची आयात केली आहे. हा कांदा भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. बाजारपेठेत कांद्याचे दर वाढल्यामुळे काद्यांची आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या आयातीमुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि अन्य प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. ही आयात बंद करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
परदेशातून कांद्याची आयात केल्यामुळे कांद्याच्या दरावर परिणाम झाला आहे. कांद्याचे दर कमी झाले आहेत. मंगळवारी लासलगाव बाजारपेठेत कांद्याला प्रतिक्विंटल ७ हजार १०० रुपयांचा दर होता, तर बुधवारी दर कमी होऊन तो ५ हजार ८०० रुपयांवर आला. अन्य बाजारपेठांवरही याचा परिणाम जाला आहे. किंमतीत आणखी घट होण्याच्या भितीने शेतकऱ्यांनी बाजार समितीत धाव घेतल्याचे पाहायला मिळाले.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने शेतकऱ्यांनी कमी किंमतीला कांदा विकू नये, असे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांना बाजार समितीत गर्दी करुन नये असेही म्हटले आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना सर्वात कमी किंमतीने कांद्याची विक्री केली. या काळात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तेव्हा त्याच्यावर कोणीही बोलले नाही. त्यावेळी कोणीच हस्तक्षेप केला नाही. आता कांद्याला चांगला दर मिळत आहे, तर सरकार कांद्यांच्या आयातीला प्रोत्साहन देत आहे. सरकारने कांद्याचे दर खाली आणण्याचा प्रयत्न करु नये, असे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले.
कांद्याची आयात केल्यामुळे याचा दरांवर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ३३ टक्के वाटा आहे. परंतू, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सलग पावसाने या नवीन कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याची आयात करून सरकार किरकोळ बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, याचा बाजारपेठेवर फारसा परिणाम होणार नसल्याचे शेतमाल अभ्यासकांनी म्हटले आहे. कारण ही आयात थोड्या प्रमाणातील आहे. तसेच मागील अनुभवावरुन जरी परदेशातून कांद्याची आयात करण्यात आली असली तरी ग्राहकांनी देशी कांद्यालाच पसंती दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.