मराठी पाऊल पडते पुढे! जुन्नरच्या सुपुत्राचे कोरोना औषधाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण संशोधन

Smiley face 2 min

टीम ई ग्राम – कोरोनावरील उपचारामध्ये रेमडिसिव्हीर हे औषध प्रभावी ठरत आहे. याच औषधाच्या संशोधनात जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी येथील डॉ. दिनेश जगन्नाथ पायमोडे यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रेमडिसिव्हीर हे अँटीवायरल औषध असून, ते सर्वात प्रथम गिलियड सायन्सेस (Gilead Sciences) या अमेरिकन कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर ‘हेपॅटायटीस सी’वर या आजारावरील उपचारासाठी सन २००९ मध्ये शोधून विकसित केले होते. मात्र, हेपॅटायटीस ‘सी’ वर ते फारसे प्रभावशाली नसल्याचे समजताच कंपनीने त्याचे पुढील संशोधन थांबवले आणि या औषधाचा साठा तसाच जतन करून ठेवला. मात्र, सन २०२०च्या सुरवातीला या औषधाची चाचणी कोविड-१९ संक्रमित रुग्णांवर केली. त्यात ते प्रभावी असल्याचे आढळून आले.

वाचा:  ‘वेळेत पीक कर्ज फेडणाऱ्यांना परतावा’

रेमडिसिव्हीरच्या मूळ उत्पादन प्रक्रियेत साधारण २५ रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर ते उत्पादित केले जाते. या सगळ्यात साधारण ७० वेगवेगळी रसायने (कच्च्या मालाच्या रुपात) वापरली जातात. रेमडिसिव्हीरच्या एका बॅचच्या उत्पादनासाठी साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी लागतो. डॉ. पायमोडे यांनी ‘रेमडिसिव्हीर रेणूमधील महत्त्वाच्या अशा पायरोलोट्रियाझिन (Pyrrolotriazine) या Precursor निर्मितीमध्ये नवीन संशोधन करून त्या विशिष्ट कोअरची निर्मिती ४ स्टेप्सवरून २ स्टेप्सवर आणली. त्यामुळे त्याचे उत्पादन ३१ टक्क्यांवरून ५९ टक्क्यांपर्यंत वाढविले. हे एक नाविन्यपूर्ण संशोधन असून, अमेरिकन केमिकल सोसायटीच्या ऑरगॅनिक लेटर्स या नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहे.

वाचा:  नुकसानग्रस्तांसाठी मिळाले ‘इतके’ कोटी रुपये

डॉ. पायमोडे यांचा परिचय
डॉ. दिनेश पायमोडे यांचे प्राथमिक शिक्षण चाळकवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण पिंपळवंडी येथील शिवांजली विद्या निकेतनमध्ये झाले असून. त्यांनी आळे येथील बी. जे. महाविद्यालयात बी.एस्सी.चे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तर पदव्युत्तर शिक्षण हे त्यांनी पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पूर्ण केले. रसायनशास्त्र विषयात पुण्यातील एन.सी.एल. या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रयोगशाळेत पीएच.डी.साठी ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमना यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती झाली. त्यांनी तेथे यशस्वीरीत्या संशोधन केले. ते विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. ते सध्या अमेरिकेतील मेडीसीन्स फॉर आल (Medicines For All) या औषधनिर्माण शास्त्रातील प्रतिष्ठित संशोधन संस्थेमध्ये ‘शास्त्रज्ञ’ या पदावर कार्यरत आहेत.

वाचा:  केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकरी हिताचे - हंसराज अहीर

‘रेमडिसिव्हीर’ या औषधाच्या निर्मितीसाठी विकसित केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करण्यास कुठल्याही मर्यादा घातलेल्या नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त औषध कंपन्या या प्रक्रियेचा वापर करू शकतात. या संशोधनाचा फायदा हा रेमडिसिव्हरचे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, उत्पादनासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी आणि या औषधाच्या मागणी व पुरवठा यांचा समतोल राखण्यासाठी केला जाऊ शकतो, असे डॉ. दिनेश पायमोडे यांनी सांगितले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App