खरीप कांदा बियाण्याची होणार ऑनलाइन विक्री

Smiley face < 1 min
कांदा
खानदेशात कांदा लागवड घटण्याची शक्यता

ई ग्राम : कोरोना प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप हंगामासाठी विकसित केलेले फुले समर्थ आणि बसवंत-780 हे सत्यप्रत बियाणे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार चालू वर्षी सोमवार(ता.8)पासून ऑनलाइन कांदा बियाणे विक्री होणार आहे.अशी माहिती विद्यापीठाच्या बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.आनंद सोळंके यांनी दिली. 

दरवर्षी नाशिक,जळगाव,धुळे,औरंगाबाद व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामातील कांदा बियाणे खरेदी करण्यासाठी विद्यापीठात दरवर्षी मोठी गर्दी होते.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व गर्दी नियंत्रित करण्यासाठी विद्यापीठाने शासनाच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे.शेतकऱ्यांची होणारी गैरसोय व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग नियंत्रित आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवार(ता.8) पासून बियाणे उपलब्ध असेपर्यंत नोंदणी https://www.phuleagromart या वेब पोर्टलवर केली जाणार आहे. ऑनलाइन पध्द्तीने नोंदणी झाल्यानंतर पुढील 36 तासांच्या आत बियाण्याची रक्कम विद्यापीठ बॅंक खात्यावर जमा करण्यासाठी आरटीजीएस,एनइएफटी तसेच नेटबॅंकिंग हे पर्याय देण्यात आले आहेत. रक्कम जमा करून रकमेचा व्यवहार क्रमांक नमूद केल्यानंतर बियाण्याची मागणी निश्‍चित होणार आहे,अन्यथा नोंदणी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

अशी आहे विक्री प्रक्रिया:

प्रति सातबारा 2 किलो बियाणे नोंदणी करण्यात येईल.कांदा सत्यप्रत बियाणे दर प्रतिकिलो 1500 रुपये आहे.बियाणे नोंदणी व खरेदी करतेवेळी शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश पाठवून अगोदर कळविण्यात येईल. बियाणे खरेदी करताना बियाणे नोंदणी केलेला पुरावा,आधार कार्ड,सातबारा उतारा, बँकेत रक्कम जमा केल्याची ऑनलाइन पावती सादर करावी लागणार आहे.पूर्णनोंदनी केलेल्या शेतकऱ्यांनाच कांदा बियाणे दिले जाईल, कुठल्याही परिस्थितीत रोखीने बियाणे विक्री होणार नाही,असे विद्यापीठाच्या बियाणे विभागाने कळविले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App