कृषी शिक्षण : भेंडी लागवड

Smiley face 2 min

ई ग्राम : भेंडी हे भाजीपाला पीक मूळचे दक्षिण आफ्रिकेतील किंवा आशिया खंडातील मानले जाते. भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. भेंडीमध्ये विविध जीवनसत्वे, लोह तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. भेंडीच्या झाडाचा वापर कागद तयार करण्यासाठी केला जातो. या अशा विविध कारणांमुळे मागणी असलेल्या भेंडीची लागवड करणे शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे ठरू शकते.
हवामान व जमीन : या पिकास उष्ण हवामान जास्त मानवते. २० अंश ते ४० अंश सेल्सिअस तापमान या पिकासाठी योग्य मानले जाते. ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात फुलांची गळ होऊ शकते. तर दमट हवामानात भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

सुधारित जाती : १) परभणी क्रांती २) अर्का अनामिका ३) ए. के. ओ. व्ही. – ९७ – १६ ४) फुले कीर्ती ५)फुले उत्कर्षा ६) पुसा सावनी

लागवड हंगाम व लागवड : भेंडी लागवड खरीप (जून – जुलै) आणि उन्हाळी (जानेवारी – फेब्रुवारी) हंगामात करतात. कोकण विभागात भेंडीची लागवड रब्बी हंगामात करता येते. निर्यातीसाठी सतत पुरवठा करण्याकरिता पीक टप्प्या टप्प्यात १५ – २० दिवसाच्या अंतराने पेरावे.

खत व्यवस्थापन :जमीन तयार करताना हेक्टरी २५ते ३० टन शेणखत जमिनीत मिसळावे. तसेच हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी अर्धे नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.

पाणी नियोजन : पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. उन्हाळी हंगामांत ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे.

आंतरमशागत :
गरजेनुसार निंदणी करून तणांचा बंदोबस्त करावा. पिकाला मातीची भर द्यावी. पावसाळ्यात पाणी साठू नये म्हणून चर काढून घ्यावेत. लागवडीपूर्वी ४ ते ५ दिवस अगोदर २ ते २.५ लिटर बासालीन साधारण ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास तणांचा बंदोबस्त होतो.

रोग व किडी :
रोग : भुरी, पानांवरील ठिपके
किडी : फळे पोखरणारी अळी, खोडकिडा, तुडतुडे.

संजीवकांचा वापर :
१. जिबरेलिक ऍसिड १० पी. पी. एम. फवारल्यास हिरव्यागार व लुसलुशीत भेंडी मिळतात.

२. फळ तोडणीच्या एक दिवस अगोदर एन. ए. ए. २० पी. पी. एम. व अल्ट्राझाईम १०० पी. पी. एम. फवारल्यास दूरच्या बाजारपेठेत पाठविताना भेंडी लुसलुशीत राहते.

काढणी : बी लावल्यापासून ४० ते ४५ दिवसांत भेंडीला फुले येतात. फुले आल्यानंतर चौथ्या ते सहाव्या दिवसापर्यंत भेंडीची जास्तीत जास्त लांबी, जाडी आणि वजन वाढते. त्या वेळीच त्याची काढणी करावी. एक दिवसाआड भेंडीची तोडणी करावी. तोडणी सकाळी केल्यास भेंडीचा ताजेपणा, रंग अन तजेला जास्त काळ टिकून राहतो. तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवावी.

उत्पादन : भेंडीचे हेक्टर उत्पादन १२-१५ टन मिळते.

सौजन्य : किसान न्यूज चॅनेल

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App