‘या’ जिल्ह्यात ११ मार्चपासून लॉकडाऊन; काय सुरू,काय बंद पाहा

Smiley face 2 min

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तसेच शनिवार, रविवारी कडक स्वरूपात लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी माध्यमांना दिली. त्याचबरोबर नागरिकांनी त्रिसूत्रीची काटेकोरपणे दैनंदिन जीवनात अंमलबजावणी करावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी त्यांच्या देवगिरी निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मनपा पोलिस आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.

egram

यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाला अंशत: लॉकडाऊन करावे लागत आहे. या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी प्रशासनाला सक्रीय सहकार्य करावे.जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण बदलते असून संसर्गामध्ये कुटुंबच्या कुटुंबे बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यादृष्टीने वाढीव चाचण्यांची सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या धार्मिक सभा, राजकीय सभा, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मिरवणुका, आंदोलने, मोर्चे, धरणे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच आठवडी बाजार, जलतरण तलाव , क्रीडा स्पर्धा बंद राहतील (मात्र, खेळाडूंच्या नियमित सरावास कोविड १९ च्या शिष्टाचाराच्या पालनासह परवानगी राहील). सर्व प्रकारची सभागृहे, मंगल कार्यालये, लॉन्स पूर्णपणे बंद राहतील. तसेच कोणत्याही सार्वजनिक विवाह समारंभास परवानगी असणार नाही. तथापि नोंदणीकृत पद्धतीने विवाहास परवानगी असेल. औरंगाबाद शहरातील जाधवमंडी ११ मार्च ते १७ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहील, असेही चव्हाण म्हणाले.

जिल्ह्यातील हॉटेल, बार, परमीट रुम, रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह, दुकाने व इतर आस्थापने सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच रेस्टॉरंटस, हॉटेल्स, खाद्यगृहे एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के पर्यंत सुरू ठेवता येतील. जिल्ह्यातील परीक्षार्थ्यांच्या अभ्यासाठी वापरात असलेले सर्व वाचनालये, अध्ययन कक्ष एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के इतक्या क्षमतेच्या मर्यादेने सुरू ठेवता येतील.

दरम्यान, ज्या आस्थापना व नागरिक आदेशाचे उल्लंघन करतील ते सर्व संबंधित, इतर अनुषंगिक दंडात्मक कार्यवाहीसह, साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भा.द.वि. १८६० मधील तरतुदींअन्वये त्यांचेवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App