टीम ई ग्राम – महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने कृषी क्षेत्रात पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राखले आहे. सर्व गृहितकांना चुकीचे सिध्द करत सप्टेंबर २०२० च्या ट्रॅक्टर विक्रीत कंपनीने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. कंपनीने आपल्या सर्व स्पर्धकांना मागे टाकत ट्रॅक्टर विक्रीत १८ टक्क्यांची घसघशीत वाढ केली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या ट्रॅक्टर विक्रीच्या कंपनी अहवालानुसार महिंद्रा कंपनीने ४२ हजार ३६१ ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री केली आहे. मागील वर्षी विक्रीचा हा आकडा ३६ हजार ०४६ एवढा होता. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीने १८ टक्के जास्त ट्रॅक्टरची विक्री केली आहे. तर मागील वर्षी ९६५ ट्रॅक्टरची कंपनीने विदेशात निर्यात केली होती. यावर्षी निर्यातीत ६ टक्क्यांची वाढ होत १ हजार ०२५ ट्रॅक्टरची निर्यात केली आहे.
महिंद्राने आपलाच विक्रम काढला मोडीत –
महिंद्राने सप्टेंबर २०१९ चा स्वतःचा विक्रम मोडला आहे. मागील वर्षी, जेथे देशांतर्गत आणि परदेशी निर्यात असे मिशून एकूण ३७ हजार ०११ युनिटचे ट्रॅक्टर विकले होते. यावेळी देशांतर्गत आणि परदेशी निर्यात असे मिळून एकूण ४३ हजार ३८६ ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. इतकेच नाही तर मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी कंपनीच्या निर्यातीतही वाढ झाली आहे.
कृषी क्षेत्राची शान आहे महिंद्रा –
ग्रामीण भारतातील ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांपैकी महिंद्राला कृषी क्षेत्राची शान म्हटले जाते. कंपनीचे ट्रॅक्टर नागपूर प्रकल्पामध्ये तयार झाल्यानंतर इतर राज्यात विक्रीसाठी येतात. यासह ही कंपनी शेतीची इतर उपकरणेही तयार करते.
दरम्यान, देशात कोरोना महामारीचे संकट असतानाही कंपनीने विक्रीत लक्षणीय वाढ केली आहे. यावर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे शेती उपकरणे विभागाचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले की, यंदा झालेला चांगला पाऊस आणि वेळेवर पेरण्यांमुळे ट्रॅक्टरच्या विक्रीत वाढ झाली. तसेच मोठ्या प्रमाणावर झालेली खरीपाची लागवड, शासकीय पाठबळ आणि मुख्य पिकांसाठी एमएसपी यांचा यात समावेश आहे. आगामी उत्सवाच्या काळात आम्ही जोरदार मागणीची अपेक्षा करीत आहोत. या यशाचे सर्व श्रेय सिक्का यांनी कंपनीच्या सर्व कर्मचार्यांना दिले आहे.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.