कोथिंबिरीचं पीक लय भारी; उत्पन्न मिळवून देई लाखावरी

Smiley face 2 min

टीम ई ग्राम – यावर्षी जून महिन्याच्या सुरूवातीपीसूनच समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग या पारंपारिक पिकांना शेतकऱ्यांनी प्रामुख्याने प्राधान्य दिले. मात्र, यावर्षी बऱ्याच ठिकाणी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. भारतात दरवर्षी शेतकरी या ना त्या कारणाने संकटात सापडतच असतो. यासाठी शासनाचे कृषी क्षेत्रासंदर्क्षात असलेले उदासीन धोरण कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांपासून मात्र औसा तालुक्यातील उजनी येथील शेतकऱ्यांसाठी कोथिंबिरीचे पीक वरदान ठरले आहे. कोथिंबिरीतून येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर भरघोस उत्पन्न मिळत आहे. यंदा बहुसंख्य शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन यांसारख्या पारंपरिक पिकांना प्राधान्य दिले. परंतु या वर्षी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पीक उगवले नाही. यातील अनेकांनी सोयाबीनची दुबार पेरणी न करता कोथिंबीर पिकाची लागवड केली. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी जून, जुलै, ऑगस्टमध्ये कोथिंबीर पिकाचे उत्पादन घेतले. त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून त्यांनी यामधून लाखो रुपये उत्पन्न मिळवले आहे.

वाचा:  उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत; पण...

कोथिंबीरी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. उजनी येथील औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा प्रयोगशील शेतकरी योगीराज पाटील यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अवघ्या १३ एकरात एकूण ३० लाख ८० हजारांचे विक्रमी उत्पन्न कोथिंबिरातून घेतले आहे. नियोजबद्ध आणि पूर्ण व्यवस्थापन, योग्यवेळी पावसाची हजेरी, तंत्रज्ञानाचा वापर त्याचवेळी पिकाला योग्य भाव आणि कमी उत्पादन खर्च यामुळे कोथिंबीर पिकातून भरघोस उत्पन्न त्यांना मिळाले. गावरान शेण खत वापरलेल्या जमिनीवर जुलै महिन्याच्या मध्यंतरी कोथिंबीर पिकाच्या घरगुती बियाणांची ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली. घरगुती बियाणे उपलब्ध असल्याने त्याचा अधिक फायदा झाला.

दहा दिवसांत पिकाची उगवण झाल्याचे पाहायला मिळाले. २० व्या दिवशी खुरपणी केली ज्यामुळे पिकाची वाढ होण्यास मदत झाली. तसेच करपा, घोंगाट, पाने पिवळी होणे या रोगापासून पिकांचा बचाव करण्यासाठी एकूण चार फवारणी करण्यात आल्या. त्याचा फायदा रंग आणि पिकाच्या वाढीसाठी ही झाला. पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला असून शेतामध्ये नव-नवीन प्रयोग करण्याची त्यांना आवड आहे. नियमित रोज पहाटे पाच वाजता ते आपल्या शेतात जाऊन दिवसभराच्या कामाचे नियोजन करतात. राजकीय जीवनातून वेळ काढून अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने नियोजनपूर्ण शेती करण्याचे उत्तम कला त्यांनी जोपासली आहे. हेच त्यांच्या शेतीतील यशाचे रहस्य आहे.

वाचा:  मोदी सरकारला धोरण लकवा झालायं; काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन

कोथिंबीर हे पीक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे दिसून आले आहे. हे पिक शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय असून त्यामुळे मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे. खासगी वाहनांदेखील वाहतूक करण्यासाठी कोथिंबीर हे पीक फायदेशीर ठरत आहे. एरवी शेतकऱ्यांना आपला शेतीमाल घेऊन स्वखर्चाने बाजारपेठेत जावे लागते. मात्र, या पिकासाठी स्वतः व्यापारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मालाची खरेदी करतो. अगदी सव्वा महिन्यात येणारे पीक शेतकऱ्यांना नगदी पैसे देऊन जाते. कोथिंबिरीने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नवसंजीवनी आणण्याचे काम केले असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोथिंबिरीला योग्य भाव मिळत असून यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भावाची खात्री करूनच मालाची विक्री करावी, असे आवाहन देखील पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांना केले.

वाचा:  पावसामुळे डाळींब, सीताफळाची आवक घटली; बाजारात मंदी कायम

दरम्यान, शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा परिपूर्ण अभ्यास करून शेतीमध्ये आवश्यक बदल करण्याची गरज आहे. अलीकडे अनेक शेतकऱ्यांचा पारंपरिक पिकांना बगल देत कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड करण्याकडे कल असल्याचे योगीराज पाटील यांनी सांगितले. तर उजनी परिसरातील शेतकऱ्यांना कोथिंबीर पिकातून चांगले उत्पन्न मिळत आहे. या पिकामध्ये उष्णता असल्यामुळे त्याचा इतर पिकावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ते एकाच जमिनीवर न घेता क्षेत्र बदलून घेतल्यास फायदा होईल, असे कृषी सहायक बालाजी घोडके यांनी सांगितले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App