मोर्शीत होणार संत्रा प्रक्रिया उद्योग; उत्पादकांच्या आशा पल्लवीत

Smiley face 2 min

नागपूर : मोर्शी तालुक्‍यात नव्या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आल्यानंतर संत्रा उत्पादकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. या माध्यमातून संत्रा उत्पादकांना न्याय मिळेल, अशी भावना विदर्भातील संत्रा उत्पादकांमधून व्यक्‍त होत असताना अनेक घोषणांपैकी ही देखील एक घोषणा तर ठरणार नाही, अशी भीती देखील दुसऱ्या बाजूने व्यक्‍त होत आहे.

महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी या प्रकल्पाच्या घोषणेमागे ॲग्रोवनचा पाठपुरावा हे देखील एक कारण नोंदविले आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प सोमवारी (ता.८) जाहीर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी मोर्शी तालुक्‍यात संत्रा प्रक्रिया उद्योगाची घोषणा केली.

egram

या निर्णयाचे संत्रापट्ट्यातून स्वागत करण्यात आले आहे. मात्र, ही घोषणा प्रत्यक्षात यावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. यापूर्वी ठाणाठुणी (मोर्शी, अमरावती) येथे जैन आणि कोकाकोला यांच्या संयुक्‍त भागीदारीतून २९ डिसेंबर २०१७ मध्ये संत्रा प्रक्रिया उद्योगाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता. परंतु हा प्रकल्प आजवर कार्यान्वित होऊ शकला नाही.

काटोल येथील मल्टीलाईन प्रकल्पाची चाके गेल्या २५ वर्षात हालली नाहीत. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचा असून त्याची उभारणी २० कोटी रुपयांतून करण्यात आली होती. हा प्रकल्प एका खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आला. त्यानंतर अल्पावधीतच तो न्यायालयीन प्रक्रियेत अडकला. एमएआयडीसीचा दुसरा प्रकल्प मायवाडी (मोर्शी) येथे आहे. हा प्रकल्प महाऑरेंजला गेल्या चार वर्षांपासून चालविण्यासाठी देण्यात आला आहे.

बांग्लादेश, दुबई या देशांमध्ये निर्यात करण्यासोबतच कॉर्पोरेट कंपन्यांना या प्रकल्पातून संत्र्याचा पुरवठा होतो. कारंजा घाडगे (जि. वर्धा) येथे पणन विभागाचा ग्रेडिंग, कोटिंग प्रकल्प आहे. तो देखील महाऑरेंजव्दारे संचालित होतो. हे दोन पहिल्या टप्प्यातील संत्रा प्रक्रियेचे सुरू स्थितीतील प्रकल्प वगळता संत्र्यावर खऱ्या अर्थाने प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प या भागात नाही. परिणामी उत्पादकता वाढल्यास दराअभावी संत्रा रस्त्यावर फेकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय राहत नाही.

आमदार भुयार यांचे प्रयत्न फळास
वरुड, मोर्शी तालुक्‍यात ६५ हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. या भागात संत्रा प्रक्रिया उद्योग उभारावा याकरिता आमदार देवेंद्र भुयार सुरुवातीपासून प्रयत्नशील होते. चार दिवसांपूर्वीच त्यांनी या विषयावर उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. ॲग्रोवनमध्ये फेब्रुवारी महिन्यात प्रकाशित संत्रा प्रश्‍नांची पाच भागाची मालिका त्यांनी अभ्यासली. त्याच आधारे त्यांनी संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न उपमुख्यमंत्र्यांसमोर रेटले. आता थेट प्रकल्पाची घोषणा झाल्याने संत्रा उत्पादकांना न्याय मिळाला आहे.

“एकूण संत्रा उत्पादनाच्या ४० टक्‍के फळे ही छोट्या आकाराची (टूल्ली) असतात. त्यावर प्रक्रिया झाल्यास संत्र्याचे दर कधीच खाली येणार नाहीत. हा भाग खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम् होईल. त्यासाठी राज्य सरकारने केलेली प्रक्रिया उद्योगाची घोषणा निश्चितच नवा आशावाद ठरणारी आहे.”
श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

विदर्भातील संत्रा लागवड (हेक्‍टर)
नागपूर – २७ हजार
अमरावती – ६५ हजार
उर्वरित विदर्भ – ७ हजार

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App