रेमडेसिवीरचे उत्पादन वाढणार; हैदराबादनंतर गुजरात, गोवा येथे उत्पादन

Smiley face < 1 min

ई ग्राम : देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेमडेसिवीर आणि टोसिलिझुमॅब या औषधांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे; मात्र या औषधांचे उत्पादन आणि पुरवठा मर्यादित असल्याने अडचणी येत होत्या; मात्र आता रेमडेसिवीरच्या उत्पादनात वाढ होणार असून हैदराबादनंतर आता गुजरातच्या नवसारी आणि गोवा येथे उत्पादन केले जाणार आहे.

सध्या हेट्रो रेमडेसिवीरचे उत्पादन हैद्राबादमध्ये होत आहे. आता याच कंपनीचे उत्पादन नवसारी गुजरात येथेदेखील करण्यात येणार आहे; तर सिप्ला या कंपनीच्या रेमडेसीवीरचे उत्पादन बडोदा, गुजरात येथे सुरू असून गोव्यातदेखील त्याचे उत्पादन सुरू केले जाणार आहे.

वाचा:  बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ, भारताला बांगलादेशकडून आयातीची आशा

मायलॅन या कंपनीलासुद्धा या औषधांचे उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यांचेही रेमडेसिवीर बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा पुरवठा वाढण्यास मदत होणार आहे.

राज्याला 21,500 इंजेक्‍शन मिळणार
महाराष्ट्रात येत्या आठवड्यात रेमडेसिवीर या औषधाची साधारणतः 21,500 इंजेक्‍शन उपलब्ध होतील, असे उत्पादकांतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच टोसिलिझुमॅब या औषधाची जागतिक स्तरावर अधिक मागणी असल्यामुळे जगभरात तुटवडा निर्माण झालेला आहे. तरीसुद्धा या औषधांचा जास्तीत जास्त साठा आयात करून राज्यात अधिक प्रमाणात साठा उपलब्ध करण्यासाठी वितरक कंपनीने प्रयत्न करावेत, अशी सूचना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

रेमडेसिवीर आणि टोसिलिझुमॅब ही औषधे महाराष्ट्रभर सम प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे, निर्देश संबंधितांना दिले आहेत. तसेच सध्या या औषधांचे वितरण काही ठराविक वितरकांकडून केले जाते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. ती टाळण्यासाठी या औषधांची विक्री अधिक वितरकांकडून करण्याच्या सूचनाही संबंधित कंपनीला दिल्या आहेत.

डॉ. राजेंद्र शिंगणे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App