१५ व्या वित्त आयोगाचा अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सादर

Smiley face < 1 min

नवी दिल्ली – १५ व्या वित्त आयोगाने आपला २०२१-२२ ते २०२५-२६ या वर्षांपर्यंतचा अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सादर केला आहे. आयोगाला विविध महत्वपूर्ण आणि विस्तृत विषयांवर आपल्या शिफारशी पाठविण्यास सांगितले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणारा निधी, आपत्ती व्यवस्थापन निधी या व्यतिरिक्त विविध राज्यांतील ऊर्जा, थेट लाभ हस्तांतरण योजना, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी कार्यांचे परीक्षण करुन आयोगाला आपल्या शिफारशी पाठविण्यास सांगितले होते. आयोगाने या सर्व अटींबाबत आपले मत केंद्र सरकारला या अहवालातून दिले आहे. अध्यक्ष एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल सादर केला.

हा अहवाल चार खंडांचा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या खंडात पूर्वीप्रमाणे मुख्य अहवाल असून त्यासोबत त्याची पुरवणी आहे. तिसरा खंड केंद्र सरकार संबंधी असून त्यात महत्वाच्या विभागांची सखोल तपासणी केली असून त्यात मध्यम मुदतीतील आव्हाने आणि पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन केले आहे. चौथा खंड पूर्णतः राज्यांना समर्पित आहे. आयोगाने प्रत्येक राज्यातील वित्तीय स्थितीचे सखोल विश्लेषण केले आहे आणि प्रत्येक राज्याला विशिष्ट राज्यातील परिस्थितीबाबतच्या आव्हानांचे निराकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.

या अहवालातील शिफारशींनुसार निवेदन देऊन, संसदेत पटलावर ठेवल्यानंतर नागरीकांसाठी सार्वजनिक केला जाईल. या अहवालाचे आवरण आणि शीर्षक हे वेगळे असून ‘कोविड काळातील वित्त आयोग – अहवाल’ असे त्याचे नाव आहे. आवरणावरील तराजूचे चित्र राज्य आणि केंद्र यांच्यातील तोल सांभाळला जात आहे, असल्याचे दर्शवित आहे.

वित्त आयोग –
संघराज्य पद्धतीत घटकसत्तांमध्ये वित्तीय तोल राखण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. भारत हे संघराज्य असल्यामुळे भारतात अशी व्यवस्था भारतीय संविधानाच्या कलम २८० नुसार वित्त आयोगाच्या रूपाने करण्यात आली आहे. सामान्यतः दर पाच वर्षांनी वित्त आयोग नेमला जावा, अशी ही तरतूद आहे. तथापि राष्ट्रपतींना आवश्यक वाटल्यास पाच वर्षांच्या कालावधीपूर्वीही नवा वित्त आयोग अस्तित्वात येऊ शकतो.

ह्या आयोगात अध्यक्ष धरून पाच सदस्य असतात. सदस्यांच्या निवडीसाठी अर्हता काय असावी, आणि हे सदस्य कशा प्रकारे निवडले जावेत हे संसदेला कायद्याद्वारे निर्धारित करता येईल, हे भारतीय संविधानाच्या कलम २८० (२) मध्ये नमूद करण्यात आले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App