भगिरथ भालके विरुद्ध समाधान आवाताडे निवडणूक रंगणार

Smiley face 2 min

सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांपैकी ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १९ जण रिंगणात आहेत. त्यात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके विरूद्ध भाजपाचे समाधान आवताडे असा थेट सामना रंगणार आहे. पण काही अपक्षांमुळे दोघांचीही डोकेदुखी वाढणार आहे. विशेष म्हणजे आवताडे यांना त्यांचेच चुलतबंधु सिद्धेश्वर आवाताडे यांनी आव्हान दिले आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. तर आता उर्वरित १९ जणांमध्ये भालके, आवताडेंसह मात्र शिवसेनेच्या बंडखोर शैला गोडसे, अपक्ष सिध्देश्वर आवताडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनी आपले अर्ज कायम ठेवले. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे.

egram

राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपलाही फटका
भाजपने समाधान आवताडे आणि आमदार प्रशांत परिचारक यांच्यातील मतांची विभागणी होऊ नये, यासाठी दोघांचा समेट घडवून परिचारक यांच्या संमतीने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली, पण ऐनवेळी आवताडे यांचे चुलत बंधू

सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी दाखल करुन या सगळ्यावर पाणी फेरले. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः यात मध्यस्थी करत सिद्धेश्वर आणि त्यांचे वडील बबनराल आवताडे यांची समजूत काढली. पण हा प्रयत्न निष्फळ ठरला. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या बंडखोर शैला गोडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा फटका भगिरथ भालके यांना बसु शकतो.

कल्याणरावांचे तळ्यात मळ्यात
मूळचे काँग्रेसचे कल्याणराव काळे हे गतवर्षी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपात गेले. पंढरपूर तालुक्यात मानणारा त्यांचाही एक वर्ग आहे. पण सध्या ते शांत आहात. भाजपात पण तिथे जाऊनही त्यांच्या साखर कारखान्यांना हवीती मदत मिळाली नाही. आता पून्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही त्यांनी संपर्क केल्याचे बोलले जाते. पण अद्यापही त्यांचे तळ्यात मळ्यात सुरु आहे.

….म्हणून आमची उमेदवारी
महाविकास आघाडीशी सख्य असूनही या निवडणूकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिन पाटील यांच्या रुपाने उमेदवार देत महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांची ऊसबिले थकली आहेत, शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली जात आहेत, हे सरकार आमच्या काही कामाचं नाही, वीजबिलासाठी आम्ही आंदोलने केली. पण दखल घेतली जात नाही. या सरकारला धडा शिकवण्यासाठीच आम्ही उमेदवारी दिली आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी पंढरपुरात स्पष्ट केलं. त्यामुळे निवडणूकीतील रंगत आणखीनच वाढली आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App