सांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव

Smiley face 2 min

सांगली : गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे सौदे सुरू झाले असून बेदाण्याच्या मागणीत किंचित वाढ झाली आहे. बेदाण्याला सरासरी १४० ते १८५ रुपये प्रति किलो असा दर मिळत असून दर स्थिर आहेत. बाजार सुरू झाल्यापासून पंधरा दिवसांत सुमारे ८ ते ९ हजार टन बेदाण्याची विक्री झाली असून महिनाअखेर एकूण १५ ते २० हजार टन बेदाणा विकला जाईल. देशातील बाजारपेठा पूर्ववत येण्यास आठवड्याचा काळ लागणार असून बेदाण्याच्या मागणीत वाढ होईल आणि दर सुद्धा वाढतील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

बेदाण्याचा बाजार सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहे. गेल्या आठवड्यात बेदाण्याची विक्री ३ ते ४ हजार टन इतकी झाली होती. मात्र, देशासह राज्यातील बाजारपेठा अजून पूर्ववत सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळे बेदाण्याच्या मागणीत काही प्रमाणात घट झाली होती. परिणामी बेदाण्याच्या दरात पाच ते दहा रुपयांनी घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

वाचा:  नुकसानग्रस्तांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

सध्या सण व उत्सव नसल्याने फारशी मागणी नसली तरी दररोज खाण्यासह बेकरीसाठी बेदाणा विक्री होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून देशासह अन्य ठिकाणीच्या बाजारपेठा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे बाजारात मागणीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे दरात पुन्हा प्रति किलोस पाच ते १० रुपयांची वाढ झाली आहे. या आठ दिवसांत ५ ते ६ हजार टनांची विक्री झाली आहे.

वाचा:  नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा; जाणून घ्या नेमकं किती मिळणार?

दरम्यान, कोरोना विषाणूचा पुन्हा प्रादुर्भाव वाढला तर अडचणी निर्माण होतील. अशी भीती अजूनही शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे सौदे सुरू झाल्यापासून बेदाणा विक्रीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. परंतु मागणी आणि दर याचा अभ्यास करून शेतकरी बेदाणा विक्री करतील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात असल्याचे दिसते आहे. बाजारपेठेतील बेदाण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे या महिन्याअखेर एकूण १५ ते २० हजार टन बेदाण्याची विक्री होईल.

वास्तविक पाहता, एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत बेदाण्याचे सौदे सुरू होते. त्यादरम्यान, बेदाण्याला प्रति किलोस १३० ते २०० असा दर होता. परंतू कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सौदे बंद होते. पंधरा दिवसांपूर्वी सौदे सुरू झाले. त्यादरम्यान बेदाण्यास प्रति किलोस १३० ते २०० रुपये असा दर होता. मात्र, मागणी कमी झाल्याने बेदाण्याचे दर १४० ते १८५ रुपये असे झाले. अर्थात बेदाण्याचे दर कमी झाले. परंतु पुढील दोन महिना असेच दर राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. गणपतीच्या दरम्यान, बेदाण्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे.

वाचा:  अखेर ४ दिवसांनंतर पुणे-बेंगलौर महामार्ग खुला; पाणी ओसरू लागले

बेदाणा दर (प्रति किलो)
हिरवा- १४० ते १८५
पिवळा- १५० ते १७०
काळा- ४० ते ८०

“गेल्या आठवड्यात बेदाण्याच्या मागणीत किंचित घट झाली आहे. बाजारपेठा पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे काही दिवसांत बेदाण्याच्या मागणीत वाढ होईल. सौदे सुरू झाल्यापासून बेदाण्याचे दर स्थिर आहेत.”
अरविंद ठक्कर, बेदाणा व्यापारी, सांगली

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App