‘एमएसपी’पेक्षा कमी दराने साखर विक्री सुरुच

Smiley face < 1 min

कोल्हापूर : किमान विक्री मुल्यापेक्षा (एमएसपी) कमी दराने साखर विक्री सुरुच असल्याचे धक्कादायक चित्र राज्यात आहे. साखर विक्री वाढीची संधी असणाऱ्या फेब्रुवारी व मार्च महिन्यातही ३१०० रुपये प्रमाणेही मागणी नसल्याने कारखान्यांची हतबलता वाढली आहे. राज्याचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच कमी दराने साखर विक्री करुन कारखाने स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेत असल्याचे चित्र आहे. ‘३१०० रुपयाला मागणीच नसल्याने आम्ही साखर ठेवून तरी काय करु,’ असा सवाल साखर कारखानदार करत आहेत.

देशभरातील व्यापारी साखरेसाठी उत्तर प्रदेश व महाराष्ट्रावर अवलंबून असतात. परंतु महत्त्वाच्या बाजारपेठांतील व्यापाऱ्यांना उत्तर प्रदेशची साखर स्वस्त पडते. वाहतूक खर्चात बचत होत असल्याने व्यापाऱ्यांची साखर खरेदीची मानसिकता महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशकडे अधिक आहे. यामुळे उत्तर प्रदेशातून स्थानिक बाजारात होणारी विक्री वाढली आहे.

egram

राज्यातील साखर कारखान्यांना कोणत्याही परिस्थितीत साखर विक्री अनिवार्य ठरते. राज्य बॅंकेकडून साखर पोत्यावर कर्ज घेतलेले असल्याने या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी कारखाने साखर विक्रीसाठी आटापिटा करत असतात. परंतू उत्तर प्रदेशच्या साखरेचा दणका राज्यातील साखर कारखान्यांना बसत आहे. चांगल्या प्रतीची साखर उत्तर प्रदेशातून सुलभपणे मिळत असल्याने राज्यातील साखरेला मागणी रोडावल्याने कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.

व्यापाऱ्यांकडून अडवणूक
राज्यातील कारखान्यांची परिस्थिती पाहून आता कमी भावाने टेंडर भरले जात आहेत. परवडत असेल तर द्या नाही तरी आम्ही दुसरीकडून घेतो अशी अडवणूक राज्यातील कारखान्यांना व्यापाऱ्यांकडून होत आहे. यामुळे अगदी २९०० रुपये दर घेऊन कारखाने साखर विक्री करत असल्याचे चित्र अनेक कारखान्यांचे आहे. व्यापाऱ्यांनाही ही परिस्थिती माहीत झाल्याने कारखान्यांची अडवणूक होत असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले.

उन्हाळी हंगामाकडून भ्रमनिरास
शीतपेये उद्योजक व समारंभामुळे जानेवारीपासून मे पर्यंत साखरेची विक्री वेगात होते. कोरोनामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी दोन्ही घटकांकडून सावधतेने साखर खरेदी केली जात आहे. याचा विपरीत परिणाम मागणीवर झाल्याने कारखान्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यातील हंगामाची स्थिती (२७ मार्च अखेर) (लाख टनांत)
झालेले गाळप  –  ९५१
साखर उत्पादन – ९९
सरासरी उतारा – १०.४४ टक्के
बंद कारखाने – ६८

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App