साखरनिर्यात अनुदान योजना जाहीर; केंद्र सरकारचा निर्णय

Smiley face 2 min

कोल्हापूर – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या साखर निर्यात अनुदान योजनेची घोषणा केंद्र सरकारने अखेर केली आहे. केंद्राने ऑक्‍टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ अखेर ६० लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. या बरोबरच गेल्या वर्षी निर्यात झालेल्या साखरेचे थकीत ९४०० कोटी रुपयांपैकी ५३६१ कोटी रुपयांचे अनुदानही सरकार आठवड्याच्या आत देणार आहे. साखर उद्योगाच्या दृष्टीने दोन्ही निर्णय सकारात्मक असल्याने यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच साखर कारखानदारांमध्ये समाधान पसरले.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी (दि.१६) दिल्लीत याबाबतची माहिती दिली. निर्यात अनुदान योजनेअंतर्गत साखर कारखान्यांना एक क्विंटल साखर निर्यात केल्यास ६०० रुपये अनुदान मिळणार आहे. उद्दिष्टाइतकी निर्यात झाल्यास कारखान्यांना केंद्राकडून चालू हंगामासाठी ३६०० कोटी रुपये अनुदानापोटी मिळणार आहेत.

उशिरा का होईना निर्णय झाल्याने या निर्णयाचे साखर उद्योगातून स्वागत होत आहे. गेल्या वर्षीच्या योजनेपेक्षा अनुदानात क्विंटलमागे ४०० रुपयांची घट शासनाने केली. अनुदानात कपात झाली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे दर चांगले असल्याने साखर निर्यातीस चालना मिळण्याची शक्‍यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

वाचा:  राज्यातील थंडीत वाढ; हवामान खात्याची माहिती

अडीच महिन्यांनंतर गती येणार
यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत जादा साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यंदा हंगाम सुरू होऊन अडीच महिने झाल्यानंतरच्या उत्पादनावर नजर टाकल्यास हा अंदाज खरा ठरताना दिसत होता. यामुळे कोणत्याही परिस्थितीत साखर शिल्लक पडू नये यासाठी निर्यात अनुदान योजना सरकारने घोषित करावी, अशी मागणी कारखानदारांकडून सातत्याने होत होती.

११० लाख टन शिल्लक साठ्यावर यंदा देशातील साखर हंगाम सुरू झाला आहे. यातील ६० लाख टन साखर एप्रिलपर्यंत देशाबाहेर गेल्यास देशांतर्गत बाजारपेठेतील दबाव कमी होऊन साखरेचे दर चांगले राहतील, अशी आक्षा साखर उद्योगाची आहे. हीच योजना ऑक्‍टोबरच्या आधी जाहीर झाली असती, तर आतापर्यंत वीस लाख टन साखरनिर्यात झाली असती. आता कारखान्यांना गतीने हालचाली करून निर्यात करावी लागणार आहे.

वाचा:  शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी

अनुदानात कपात असूनही निर्यात फायदेशीर?
गेल्या वर्षीच्या साखर अनुदान योजनेत क्विंटलला १०४४ रुपये अनुदान शासनाने जाहीर केले होते. यंदा हे अनुदान ६०० रुपयांवर आणले आहे. असे असले तरी गेल्या वर्षी साखरेचे दरही २१०० रुपयांच्या आसपास होते. यंदा एमएसपीमुळे ते ३१०० रुपयांवर स्थिर आहेत. यामुळे अनुदानात कपात झाली असली, तरी कारखान्यांना हे अनुदानही परवडू शकते, अशी माहिती कारखानदार सूत्रांनी दिली. परिणामी आता गतीने निर्यात करणेच आवश्‍यक असल्याचे मत साखर उद्योगातील सूत्रांचे आहे.

मागील अनुदानामुळे थकबाकीचे ओझे कमी होणार
गेल्या वर्षी कोविड संकटातही कारखान्यांनी जवळ जवळ उद्दिष्टाइतकी साखरनिर्यात केली. परंतु केंद्राने ९४०० कोटी रुपयांचे अनुदान थकीत ठेवले. ‘कोविड’ स्थितीमुळे अनुदान मिळण्यावर मर्यादा आल्या. परिणामी, यंदाचा हंगाम सुरू करताना कारखान्यांवर मोठा दबाव होता. शासनाने तातडीने ५३६१ कोटी रुपये देण्याचे जाहीर केल्याने हा मोठा दिलासा देशातील कारखान्यांना मिळाला आहे. हे अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यांची थकबाकीही कमी होईल, असा अंदाज केंद्राने व्यक्त केला आहे.

वाचा:  ‘दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच सरसकट पास करणार?’

आंतराष्ट्रीय दराचे आव्हान
गेल्या काही दिवसांपासून अनुदानाच्या चर्चा होत्या. यामुळे आंतराष्ट्रीय साखर बाजारपेठेत दर घसरत आहेत. भारत कधीही हे धोरण जाहीर करू शकतो, या शक्‍यतेने आंतराष्ट्रीय बाजारात क्विंटलला २८०० रुपये असलेल्या किमती २४०० रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. दुसरीकडे शासनाकडून क्विंटलला ६०० रुपये अनुदान कारखान्यांना मिळणार असल्याची शक्‍यता गृहीत धरून आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील व्यापारी २५०० रुपये क्विंटल दराने कारखान्यांकडून निर्यातीसाठी साखर मागत आहेत. हे आव्हान मात्र साखर कारखान्यांना पेलावेच लागणार आहे. यंदा इराणमध्ये आर्थिक संकट आल्याने तेथून मागणी कमी राहण्याची शक्‍यता आहे. मात्र ही कमी इंडोनेशिया, मलेशिया हे देश भरून काढतील असा अंदाज ‘इस्मा’च्या सूत्रांचा आहे.

“केंद्राने उशिरा का होईना समाधानकारक निर्णय घेतला आहे. विशेष करून महाराष्ट्रातील कारखान्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेणे गरजेचे आहे. एप्रिलपर्यंत ब्राझीलची साखर बाजारात येणार नाही. यामुळे अजून तीन ते साडेतीन महिने तरी कारखान्यांना निर्यातीची संधी आहे. कारखान्यांनी जास्तीत जास्त साखर निर्यात करावी.”
प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App