कोरोनाला रोखण्यासाठी अशी घ्या काळजी – पोलीस अधिकारी

ई ग्राम : सध्या  जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत आहे. तसेच देशात पुढील २१ दिवस लॉक़डाउन केले आहे. राज्यशासनाकडून प्रशासनाला मिळालेल्या आदेशानुसार स्थानिक प्रशासन आपल्या परिने आपली कामे पार पाडत आहेत.

कोरोनाबाबतच्या या सर्व गोष्टी घडत असताना चांगली गोष्ट ही आहे की ज्यांच्या टेस्ट पॉझिटिव आल्या होत्या असे बरेच जण सुद्धा या रोगातून पूर्णपणे बरे होऊन दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन आपापल्या घरी गेलेले आहेत. त्यामुळे घाबरण्याचं मुळीच कारण नाही. आपल्याला एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे नागरिकांमध्ये अंतर  ठेवणे,  काळजी घेणे आणि घराबाहेर न पडणे. केंद्रशासन आणि राज्यशासन जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सूचनांची  काटेकोरपणे अंमलबजावणी करा. पुढील येणारे २१ दिवस आपल्या घरातून अत्यंत निकडीच्या कारणाशिवाय बाहेर पडू नका.

एक पोलिस अधिकारी म्हणून मी गेले काही दिवस कर्तव्य बजावत असताना आपल्या लोकांमध्ये आढळून आलेली गोष्ट म्हणजे निष्काळजीपणा, सदर गोष्टीचं गांभीर्य नसणे आणि विनाकारण आवश्यकता नसताना बाहेर पडणे, आपल्या घरासमोर किंवा कट्ट्यावर गप्पा मारत बसणे, आम्हाला काही होत नाही म्हणून असे करताना बरेच नागरिक दिसून येत आहेत. कृपा, करून ह्या गोष्टी टाळा.

आपल्या घरी राहा, कोणीही अनावश्यक रित्या बाहेर पडू नका. अगदीच अत्यंत निकडीची गोष्ट असेल तरच घरातील एक सदस्य बाहेर जाऊन ती वस्तू घेऊन येईल आणि तो सुद्धा आत जाताना सॅनिटायजर किंवा साबणाने हात पाय धूऊन आपले कपडे बाहेरील बाजूस ठेवूनच तो घरात प्रवेश करेल याची दक्षता घ्या.

एक सजग नागरिक म्हणून मनाशी निर्धार करा की मी या विषाणूची वाढणारी साखळी तोडणार आहे. मीच माझा रक्षक आहे. मित्रांनो, येणारे २१ दिवस आपल्या घरात राहून कुठल्याही प्रकारे बाहेर न येता नागरिकांमध्ये अंतर ठेऊन या विषाणूला हद्दपार करूया.

Read Previous

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना चार महिन्याचा वाढीव पगार

Read Next

चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीचे शेतकर्यांना काळजी घेण्याचे आवाहन