राज्याच्या ‘या’ भागात थंडी कायम; हवामान खात्याची माहिती

Smiley face < 1 min

पुणे – राज्याच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस कमीअधिक स्वरूपात थंडी राहणार आहे. आज रविवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथे नीचांकी ७.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तर भारतातील काही राज्यांत थंडीची लाट असल्यामुळे राज्याच्या काही भागांत थंडी वाढली आहे. दिवसभर ऊन पडत असले तरी दुपारी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मात्र, वाढत्या थंडीमुळे हा चटकाही ऊबदार वाटत आहे. सायंकाळी काही प्रमाणात थंडी कमी असली तरी मध्यरात्रीनंतर चांगलीच थंडी वाढत आहे. पहाटे किमान तापमानाचा पारा घसरून दहा अंश सेल्सिअसच्या खाली येत आहे. राज्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. राज्यातील पुणे, जळगाव, नगर, नाशिक, निफाड, परभणी कृषी विद्यापीठ, गोंदिया या भागात किमान तापमान जवळपास दहा अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी त्याहून कमी आहे.

वाचा:  अखेर ग्रामपंचायतीवर तरूणाईची सत्ता! २१ वर्षाचा ऋतुराज सरपंच तर २३ वर्षाची राजश्री उपसरपंच

कोकणात थंडीत चढउतार असल्याने किमान तापमान १५ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर अलिबागमध्ये किमान तापमानाचा पारा १५.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. मध्य महाराष्ट्रात थंडी कायम असल्याने किमान तापमान जवळपास सरासरीएवढे आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली भागात थंडी किंचित कमी आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढलेले आहे.

वाचा:  अखेर ‘ती’ भीती खरी ठरली! पोहरादेवी येथील कबिरदास महाराजांसह १९ जणांना कोरोनाची लागण

दरम्यान, मराठवाड्यात थंडी काही प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे किमान तापमान १० ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विदर्भातील अनेक भागात थंडी कायम आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा अजूनही चांगलाच घसरलेला आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App