हळद दरात सुधारणा; मिळतोय ‘इतका’ भाव

Smiley face 2 min

सांगली : देशातील यंदाच्या हळदीचा बाजार अंतिम टप्प्यात आला आहे. कोरोनामुळे हळद निर्यातीला ब्रेक लागला होता. आता निर्यात सुरू झाली असून, जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत निर्यात जोमाने सुरू होईल. गेल्या पंधरा दिवसांपेक्षा चालू आठवड्यात हळदीच्या दरात प्रति क्विंटलला १५० ते २०० रुपयांची तेजी आहे. देशांतर्गत बाजारपेठेत हळदीच्या मागणीत वाढ होईल तेव्हा दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला.

देशात आजमितीस १८ लाख क्विंटलहून अधिक हळद शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नुकत्याच बाजारपेठा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे मागणी आणि उठाव यामध्ये थोडा फरक होता. परिणामी, दरात किंचित मंदी आली होती. मात्र हळूहळू बाजारपेठा पूर्ववत झाल्यानंतर हळदीस मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे दरात १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे.

egram
वाचा:  साहित्य संमेलनाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नाहीत; ट्विट करत सांगितले कारण

सांगली बाजार समितीत दररोज सुमारे ३ ते ४ हजार क्विंटल हळदीची आवक होते आहे. सध्या हळदीचा बाजार अंतिम टप्प्यात आला आहे. जून महिन्यापासून पुढे बाजारात ३००० ते ४००० पोत्यांची आवक आणि विक्री होते. या दरम्यान बाजारात हळदीच्या दरात तेजी-मंदी होत असते. त्यामुळे हळदीस अपेक्षित दर नसल्याने शेतकरी हळद शिल्लक ठेवतात. भविष्यात देशांतर्गत बाजारपेठेत हळदीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात देखील वाढ होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

वाचा:  एमएसपीचा कायदा करा अन्यथा प्रजासत्ताक दिनी आंदोलन - राकेश टिकैत

दर पाहूनच विक्री
सध्या बाजारात हळदीच्या दरात तेजी-मंदी सुरू आहे. त्यातच पावसाळा आहे. त्यामुळे हळदीची मागणी जास्त वाढलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद शीतगृहात आणि गोडाउनमध्ये ठेवली आहे. दिवाळीनंतर हळद विक्रीसाठी शेतकरी पुढे येतील. त्यादरम्यान, हळदीचे दर पाहूनच विक्री करतील, अशी माहिती जाणकारांनी दिली.

निर्यात सुरू
कोरोनामुळे हळदीची निर्यात थांबली होती. गेल्या काही दिवसांपासून निर्यात सुरू झाली आहे. सध्या युरोप आणि बांगलादेशात १० ते १५ कंटेनर (म्हणजे २७० ते ४०५ टन) हळद निर्यात होत आहे. कोरोनामुळे हळदीस निर्यातीस अपेक्षित गती नाही. परंतु जुलै महिन्यापासून निर्यातीस गती येईल. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत निर्यात वाढेल, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.

वाचा:  संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर होणाऱ्या टिकेला सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

निर्यातीसाठीचे दर (रुपये/प्रतिक्विंटल)
बांगलादेश – ६९०० ते ७१००
युरोप –    ७८०० ते ८०००

देशांतर्गत हळदीचे दर (रुपये/प्रतिक्विंटल)
देशी कडप्पा- ६७०० ते ७१००
राजापुरी- ७३०० ते ११०००
परपेठ –  ५८०० ते ७५००

“हळदीची वर्षभर निर्यात होते. परंतु कोरोनामुळे निर्यात थांबली होती. आता हळदीची निर्यात सुरू झाली आहे. सध्या १० ते १५ कंटेनर निर्यात होत असून, येत्या काळात वाढेल. तसेच देशांतर्गत बाजारपेठेत मागणीदेखील वाढेल.”
मनोहर सारडा, हळद व्यापारी, सांगली

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App