आठ महिन्यांपासून मका चुकाऱ्यांची प्रतीक्षा

Smiley face < 1 min

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या धानोरा येथील खरेदी केंद्रावर आधारभूत खरेदी योजनेतून मका खरेदी करण्यात आला. १०५३.६६ क्‍विंटल मक्‍याच्या खरेदीला आठ महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला असताना यातील बहुतांश मका उत्पादकांना चुकारे मिळाले नाहीत.

धानोरा केंद्रावर मका खरेदीस ३१ जुलै २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्याप्रमाणे १६ शेतकऱ्यांनी ३० जुलैला केंद्रावर १०५३.६६ क्‍विंटल मका विक्री केला. त्याचे रीतसर बिल शेतकऱ्यांना देण्यात आले. संपूर्ण शेतकऱ्यांनी शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून मका विक्री कली.

परंतु तालुक्‍याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण सांगत ३० जुलै रोजी खरेदी बंद करण्यात आली. याच सबबीखाली मका चुकारे करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि याप्रकरणी शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

या शेतकऱ्यांचे रखडले चुकारे
धानोरा तालुक्‍यातील मयाळू मडावी, मलापसिंग मलिया, अर्पित तुलावी, प्रमेंद्र सहारे, जयंती लकडा, आनंदाबाई गावडे, गांडो आतला, मतरु टेकाम, रजनी वरखडे, जनीबाई मातलगी, दानू तुलावी, नरेश चिमुरकर, सुधीर भुरसे, चमरू पयडी, मंगेश आतला, मेहताब कुदराम या शेतकऱ्यांचे चुकारे थकीत आहेत.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App