द्राक्षांच्या पीक विमा परताव्याची प्रतीक्षा; शेतकऱ्यांची पालकमंत्र्यांसह प्रशासनाकडे मागणी

Smiley face < 1 min

जालना – जिल्ह्यातील नुकसानग्रस्त हजारावर द्राक्ष उत्पादकांना पीक विम्याच्या परताव्याची प्रतीक्षा आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि इतरांकडे द्राक्ष उत्पादकांनी निवेदनाद्वारे मागणी केली.

द्राक्ष हंगाम २०१९-२० मध्ये जिल्ह्यातील द्राक्ष शेतीचे ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. सोबतच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेल्या अनेक द्राक्षबागा उध्वस्त झाल्या. त्यामुळे कडवंचीसह परिसरातील द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले होते.

वाचा:  'फिटनेसचा डोस, अर्धा तास रोज'! मोदींचा मंत्र

या नैसर्गिक आपत्तीतून वाचलेला उरलेल्या द्राक्षबागा कोरोना संकटाच्या कचाट्यात सापडल्या. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना ५ ते ८ रुपये प्रति किलोने द्राक्षे विकावी लागली.

विमा उतरवून घेणाऱ्या एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना विमा परतावा देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले आहे. नुकसान झाले, त्या त्या वेळी कृषी, महसूलच्या यंत्रणेकडून पंचनामे आणि लोकप्रतिनिधींकडून झालेल्या नुकसानीची पाहणी ही झाली. मग, विमा परतावा न मिळण्याचे कारण काय? असा प्रश्‍न जिल्ह्यातील वाघरुळ मंडळाअंतर्गतच्या द्राक्ष उत्पादकांनी उपस्थित केला.

वाचा:  मराठा समाजासाठी राज्य सरकारचे ‘हे’ महत्वाचे निर्णय

दरम्यान, जवळपास एक हजारावर द्राक्ष बागायतदारांनी प्रति हेक्टरी १५ हजार रूपये पेक्षा जास्तची विमा रक्कम भरली आहे. शासनाला वस्तुस्थिती कळवून कंपनीला परतावा देण्यास भाग पाडावे, अशी मागणी द्राक्ष उत्पादकांनी केली.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App