अनाबेशाही ते आरा 15 ‘कसमादे’त सहा दशकात काय कमावले, काय गमावले..?

Smiley face 3 min

ई-ग्राम : शेतीतील योगदानासाठी ‘कैसर ए हिंद’ बहुमान मिळालेले स्व. दादाजी कोंडाजी देवरे यांनी 1963 मध्ये अनाबेशाही द्राक्ष वाणाची दाभाडीत लागवड केली होती. दाभाडी गावाने गिरणा-मोसम खोऱ्यात खऱ्या अर्थाने फळबागांचा पॅटर्न रूजवला. पुढे, ऐंशीच्या दशक गिरणा-मोसम नद्यांचे सूपीक खोरे थॉमसन, सोनाका आदी द्राक्ष वाणांनी अक्षरश: लगडले होते…90 च्या दशकात वारे फिरले. द्राक्ष बागांमधील ‘चव’ गेली होती, त्या परवडेनाशा झाल्या. याच दरम्यान – गणेश नामक डाळिंब वाणाचा श्रीगणेशा झाला होता. कमी पाणी, कमी फवारण्यात येणाऱ्या डाळिंबाने कसमादेवासियांना अक्षरश: मोहिनी घातली. डाळिंबाच्या भगवा- शेंद्र्याने समृद्धी दिली…पण ती अल्पकाळ टिकली.

सहा दशकात गिरणा-मोसमच्या पुलाखालून बरेच काही वाहून गेलेय. आज गिरणा-मोसम खोऱ्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) या चार तालुक्यांत धड ना द्राक्ष, ना डाळिंब… कुठलाही खात्रीशीर क्रॉप पॅटर्न किंवा त्याची व्हॅल्यू चेन विकसित झालेली दिसत नाही. कांदा पिकावर अवलंबून राहण्याचे दिवस आता निघून गेले आहेत…2019 मधील कांदा दरातील तेजीने दर साऱ्या भारतीय शेतकऱ्यांना कांदा लागणीचे व मार्केटचे तंत्र शिकवलेय. शेखावटी असो सटाणा, चांदवड असो वा चित्रूदुर्ग, कळवण असो वा कर्नूल अफाट कांदा लागणी आहेत. गिरणा-मोसम खोऱ्यापुढे प्रथमच मोठे संकट उभे आहे. खात्रीशीर पीक पॅटर्न व व्हॅल्यू चेन विकसित करण्याचे आव्हान आहे…

वाचा:  बाजारभाव अपडेट ८ जुलै २०२०: जाणून घ्या कोबी, फ्लॉवर , मिरची, वांगी, भेंडी, शेवगा आणि शिमला मिरचीचे बाजारभाव.
सह्याद्री फार्म्स चे अद्यक्ष श्री विलास शिंदे आणि जेष्ठ शेतमाल बाजारभाव तज्ज्ञ दीपक चव्हाण सर

हे सर्व आठवण्याचे निमित्त आहे आरा 15 ही नवी द्राक्ष व्हरायटी. रावळगाव शिवारात सह्याद्री फार्म्सचे श्री. विलास शिंदे यांनी 14 महिन्यापूर्वी आरा 15 हे परदेशी द्राक्ष वाण रूजवले. आरा 15 च्या निमित्ताने भारतात प्रथमच 14 महिन्यात दुसऱ्यांदा एका द्राक्ष वाणाचे हार्वेस्टिंग होतेय. मे 2020 महिन्यात दुसरा बहार हार्वेस्ट होतोय. श्री. शिंदे सांगतात, “आपण बेसिक संशोधनाकडे दुर्लक्ष केले. पाऊसमानाचा आणि जगाच्या बाजारपेठेचा, ग्राहकांचा कल लक्षात घेवून खूप पूर्वीच वाण बदलणे गरजेचे होते. आरा 15′ सारख्या पेटंटेड वाणाच्या माध्यमातून एक पाऊल उचलले आहे. आरा 15′ मधून वर्षातून दोनदा पीक घेण्याची संधी मिळते. पाऊसमानामुळे एक हंगाम वाया गेला तर दुसऱ्यातून नुकसान भरून काढता येणे शक्य झालेय.”

आरा 15 केवळ निमित्त आहे…मुद्दा आहे – कसमादेत खात्रीशीर पीकपॅटर्न व त्याच्या व्हॅल्यू चेन विकसित करण्याचा. पीक लागणीपासून ते ग्राहकापर्यंत माल पोच करण्याची सर्व साखळी ही शेतकऱ्यांच्या मालकीची हवी आहे. आणि याचे उदाहरण म्हणून सह्याद्री फार्म्सचे देता येईल. यापूर्वी, सहकाराच्या माध्यमातून असा प्रयोग केलाय आपण. खरेदी विक्री संघ ते साखर कारखाने यासारखे व्हॅल्यू चेनचे उत्तम उदाहरण दुसरे नसेल. पण, सहकाराची सगळ्यांनी मिळून जेवढी वाट लावता येईल, तेवढी लावलीय. ‘वसाका’ असो वा ‘गिरणा’ काहीच शिल्लक ठेवले नाही.

वाचा:  केशरी शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकारचा मोठा निर्णय

गिरणा-मोसम खोऱ्याचे एकेकाळचे पंचप्राण स्व. शरद जोशी म्हणाले होते, की मला शेतकरी संघटनेपेक्षा चेंबर्स ऑफ कॉमर्ससारखी संघटना उभी करायची होते… अलिकडेच, शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष रामचंद्र बापू पाटील म्हणाले, की सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून शरद जोशींच्या स्वप्नातील काम विलासअण्णांनी उभे केलेय… आपण सह्याद्री फार्म्सचे कौतूक करतोय. पण, स्वत: विलास शिंदे यांनाही असे कौतूक आवडत नाही. ते म्हणतात, की सह्याद्री फार्म्स एकटी कृषी परिवर्तन घडवू शकत नाही. महाराष्ट्रात ‘सह्याद्री’सारख्या 700 व्हॅल्यू चेन उभ्या करण्याची क्षमता आहे…

सहकार वाढवता आला नाही, हे खरंय. ते रडगाणं तरी किती दिवस चालवणार आहोत? नव्या काळाप्रमाणे नवे मॉडेल आलेय. फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांचे. विशेष कायदा आहे. फार्मर्स प्रोड़्यूसर कंपन्या म्हणजे एक प्रकारचा सहकारच, पण अत्यंत व्यावसायिक – प्रोफेशनल आणि कंट्रोल्ड पद्धतीचा. अकारण बजबजपूरीला, न्युसेंसला वाव नाही… भष्ट्राचार तर कुठेही होवू शकतो. पण, या मागे एक उदात्त विचार आहे. वेल्थ क्रिएशनचा. शेतकरी समाजाने फक्त पिकवायचे नाही, तर पिकवण्यापूर्वीची आणि ग्राहकाच्या हातात माल पोचेपर्यंतची सर्व व्यवस्था व त्यातील नफा शेतकऱ्याच्या घरात आला पाहिजे. त्यासाठी हुशार, प्रोफेशनल आणि जगाची जाण असलेल्या हुशार डोकी एकत्र आली तरी पुरे. आपण चालायला लागलो, की महामार्ग आपोआपच तयार होतो…

वाचा:  खरीप पीक कर्ज वितरणाला येणार गती; निकष व अटी पाळून होणार कामकाज

रेसिड्यू फ्री डाळिंब, आरा 15 सारख्या वाणांसह द्राक्ष शेतीचा नव्याने विचार, कांद्यासह रेसिड्यू फ्री भाजीपाला अशा तिन व्हॅल्यू चेन गिरणा-मोसम खोऱ्यांत उभ्या राहण्यास पुष्कळ वाव आहे. यानिमित्ताने खासकरून नुकत्याच पदवी घेतलेल्या तरूणांना एक आवाहन आहे… तुम्ही सह्याद्री फार्म्सला एकदा भेट द्या. तिथली थॉट प्रोसेस समजून घ्या. अगदी दोन तरूण एकत्र आले तरी परिवर्तन सुरू होते…कोरोना संसर्गामुळे भारतात सेवा व उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या कमी होत आहेत. सरकारी नोकऱ्यांचा तर ठावठिकाणा नाही. शिकलेल्या वर्गापुढे काय करावे असा प्रश्न आहे. तथापि, प्रत्येक समस्येत एक संधी असते या उक्तीप्रमाणे – राहून गेलेले काम करण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण शेती क्षेत्रात बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशनची मोठे काम राहून गेले होते. ते आता करावे लागणार आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही…कसे करावे याबाबत ‘सह्याद्री फार्म्स’सह अनेक उदाहरणे समोर आहेतच.

लेखक- दीपक चव्हाण, ता. 29 मे 2020.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App