लॉकडाऊनमधील वीजबिल भरणार नाही; राजू शेट्टींच्या उपस्थितीत कोल्हापूरकरांचा निर्धार

Smiley face < 1 min

कोल्हापूर : लॉकडाउनच्या काळातील वीजबिल भरणार नाही, अशी घोषणा देत सर्वपक्षीय कृती समितीतर्फे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग आज शुक्रवारी (ता.१९) रोखण्यात आला. दुपारी एकच्या सुमारास कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडल्याने वाहतूक काहीकाळ थांबली. दरम्यान, सांगली, सोलापूर, बुलडाणा, बीड, जालना येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करीत लॉकडाउन काळातील वीजबिल भरण्यास नकार दिला.

पंचगंगा नदी पुलाच्या परिसरातील पीरवाले दर्गाह येथे कार्यकर्ते सकाळी अकरा वाजता जमले. तत्पूर्वीच परिसरात प्रचंड पोलिस फौजफाटा बंदोबस्तासाठी आला होता. दुपारी बाराच्या सुमारास माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी निवडक कार्यकर्त्यांसमवेत येथे आले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर दुपारी एक वाजता सर्व कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला.

वीजबिल माफ होत नसल्याचा संताप व्यक्त करत शासनावर टीका केली. ऊर्जामंत्र्यांचे करायचे काय खाली डोक वर पाय, भरणार नाही भरणार नाही वीजबिल भरणार नाही, बंद करा बंद करा, हुकूमशाही बंद करा, अशा घोषणा देण्यात आल्या.

माजी आमदार संजय घाटगे, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, राज्य इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. जालंदर पाटील, वीजबिल भरणार नाही कृती समितीचे बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, जोतीराम घोडके, प्रा. उदय नारकर, वसंत पाटील, बाबा देवकर, अशोक पोवार, रंगराव पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल सेक्युलर, जनसुराज्य शक्ती पक्ष, शिवसेना व अन्य विविध पक्ष व संघटना आंदोलनात झाल्या.

“लॉकडाउनच्या काळातील बिल कोणत्याही परिस्थितीत भरणार नाही. त्या पुढील महिन्यांतील बिल भरण्याची आमची तयारी आहे. मात्र, तेही टप्प्याटप्याने भरले जाईल. शासनाने कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउनमधील वीजबिल माफ केलेच पाहिजे.”
राजू शेट्टी, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App